'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत दिसणार 'हा' लोकप्रिय अभिनेता; 'झी मराठी'सोबत आहे खास कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:22 IST2025-01-24T12:19:13+5:302025-01-24T12:22:46+5:30
झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत दिसणार 'हा' लोकप्रिय अभिनेता; 'झी मराठी'सोबत आहे खास कनेक्शन
Tula Shikvin Changlach Dhada: झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि हृषिकेश शेलार यांनी साकारलेली अक्षरा-अधिपतीची भूमिका अनेकांना भावली आहे. मालिका जवळपास गेली दोन वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अधिपती, अक्षरा, भुवनेश्वरी या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केल्याची पाहायला मिळते आहे. दरम्यान, दिवसेंदिवस मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नुकताच झी मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोने लक्ष वेधून घेतलंय.
सध्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये अक्षरा आणि अधिपतीच्या नात्यामध्ये दुरावा आला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. सासूबाई भुवनेश्वरीसोबत होणारे वाद या सगळ्या गोष्टींना कंटाळून अक्षरा एक मोठा निर्णय घेते. अक्षरा सासरचं घर सोडून माहेरी निघून जाते. त्यासाठी चारुहास अधिपतीची समजावून तिला एकदा भेटण्याचा सल्ला देतो.अशातच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढल्याची दिसतेय.मालिकेत हे सगळं घडत असताना आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, या नव्या प्रोमोमध्ये लोकप्रिय अभिनेत्याची झलक पाहायला मिळतेय. 'मिसेस मुख्यमंत्री' फेम अभिनेता तेजस बर्वेची 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत एन्ट्री झाल्याची पाहायला मिळतेय. तेजस पुन्हा 'झी मराठी'वर कमबॅक करत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. या मालिकेमध्ये तेजस बर्वे अक्षयाच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे तेजसच्या येण्याने अक्षरा-अधिपतीचं नातं कोणतं नवं वळण घेणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणारं आहे.