"बाबांच्या अवतारात भेटलेल्या...", मराठी अभिनेत्याने शेअर केला साईबाबांच्या शिर्डीतील विलक्षण अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:05 IST2025-04-10T15:02:59+5:302025-04-10T15:05:39+5:30
सौरभ हा साईबाबांचा भक्त आहे. तो मनोभावे त्यांची पूजा करतो. अलिकडेच रामनवमी निमित्त शिर्डीला जाण्याचा योग आला. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे.

"बाबांच्या अवतारात भेटलेल्या...", मराठी अभिनेत्याने शेअर केला साईबाबांच्या शिर्डीतील विलक्षण अनुभव
'जीव माझा गुंतला' मालिकेतून अभिनेता सौरभ चौघुले घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेनेच त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. सौरभ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो. सौरभ हा साईबाबांचा भक्त आहे. तो मनोभावे त्यांची पूजा करतो. अलिकडेच रामनवमी निमित्त शिर्डीला जाण्याचा योग आला. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे.
सौरभने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने शिर्डीमधला साईदर्शनाचा अनुभव सांगितला आहे. सौरभ म्हणतो, "श्रद्धा आणि सबुरी एक विलक्षण समीकरण आहे. आयुष्यात सेटल होण्याआधी दर महिन्याला शिर्डीची वारी व्हायची. पण, गेली ७-८ वर्ष बोलावणं आलंच नाही. योग आलाच नाही. माहीत नाही का...प्रत्येक वेळी बाबांना साकडं घालायचो की बोलावणं येऊ द्या. शेवटी बोलावणं आलंच आणि तेही रामनवमीला...तीन दिवस भरभरुन प्रेम दिलं आणि भरभरुन दर्शन दिलं. बाबांच्या पालखीपासून ते बाबांच्या रथापर्यंत...अहो इतकंच काय, इतकी वर्ष त्यांची फक्त झलक मिळावी म्हणून धडपड करायचो. आज त्यांच्या मंदिरात, त्यांच्या अंगणात उनाड पोरासारखा फिरत होतो. सगळ्या कोपऱ्यात जाऊन बसत होतो. समाधी अन् द्वारकामाईच्या आवारात तासन् तास भटकत होतो".
"त्यावर थांबले नाहीत बाबा...अचानक वादनाचा योग आला. तेही द्वारकामाई आणि चावडीसमोर...बाबा आणि त्यांचे चमत्कारिक खेळ काय कमी असतात. अहो पालखीत निशाण नाचवायची संधी दिली. ते वादन, ते भजन ते निशाण...ती सेवा करायला मिळणं. बाबांनी सगळी उणीव भरुन काढली. ती ७-८ वर्ष माझ्यातली हरवलेली शिर्डी त्यांनी भरुन काढली. निघताना बाबांना एकच म्हटलं...बाबा असेच बोलवत राहा. आणि कायम सोबत राहा", असंही पुढे त्याने म्हटलं आहे.
यासोबत त्याने "ता. क. मी तिथे Actor किंवा Celebrity म्हणून नव्हतो आणि मी तिथे आहे हे कोणालाच माहित नव्हतं.
माझे जवळचे साई सेवेकरी ज्यांच्यामुळे मला राम नवमी जगता आली त्यांनाच माहीत होत. मी तिथे एक भक्त आणि एक सेवेकरी म्हणून होतो.!! हे सगळं घडवून आणायला मला भेटलेले सर्व बाबांच्या अवतारांना माझे खूप खूप आभार", असं कॅप्शनही दिलं आहे.