"आपण करोडो रुपये खर्च करुन मालदीवला जातो, पण..."; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:23 IST2026-03-13T11:21:01+5:302026-03-13T11:23:18+5:30
Milind gawali: सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात सतत राहत असतात.

"आपण करोडो रुपये खर्च करुन मालदीवला जातो, पण..."; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत
''आई कुठे काय करते'' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी (milind gawali). आजवरच्या कारकिर्दीत मिलिंद गवळी यांनी अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता अफाट आहे. यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात सतत राहत असतात. अलिकडेच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या देशातील समुद्रकिनाऱ्यांविषयी भाष्य केलं आहे.
''आज सकाळी सकाळी आमच्याकडे पाहुणे आले. त्यांच्याबरोबर एक छोटीशी मुलगी होती, जी मुंबईला पहिल्यांदाच आली होती, तिच्याशी गप्पा मारताना ती म्हणाली "मी माझ्या आयुष्यात कधी समुद्र पाहिलेला नाहीय, माझी खूप इच्छा आहे एकदा तरी समुद्र बघायचा". आज माझा शूटिंग नव्हतं, मटा सन्मानचा कार्यक्रम पण संध्याकाळीच होता, दिवस मोकळा होता, मग मी त्या छोट्या मुलीला म्हटलं 'चल आम्ही दोघं तुला समुद्र दाखवून आणतो', दिपा ही लगेचच तयार झाली, माझ्या घरापासून जुहू बीच हा खूपच जवळ आहे. १५ मिनिटात जुहू बीचवर पोहोचलो, आणि त्या छोट्याशा लेकराने पहिल्यांदा समुद्र पाहिला.... आणि तिच्या डोळ्यात काहीतरी अद्भुत पाहिल्याचे भाव मला दिसले. इतकं पाणी बघून सुरुवातीला ती घाबरली, मग हळूहळू पाण्याजवळ गेली, तिच्या आयुष्यात पहिल्यांदा लाटांनी तिच्या पायाला स्पर्श केला, आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता,'' असं मिलिंद गवळी म्हणाले.
पुढे ते म्हणतात, ''हे सगळं पाहून मीही भारावून गेलो, मला जाणवलं की आपल्याकडे आणि आपल्या आजूबाजूला इतक्या सुंदर सुंदर गोष्टी असतात पण आपल्याला त्याची किंमत नसते, त्याच माणसांना त्या गोष्टींची किंमत असते, जो त्या गोष्टींपासून वंचित किंवा deprived असतो. कदाचित आपल्याला खूप गोष्टी साध्या सरळ सोप्या पद्धतीने मिळाल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी फार महत्त्वाच्या वाटत नाहीत. आपल्या beachesचच उदाहरण आहे... रोजच्या धावपळीत आपण किती वेळा समुद्रकिनारी जातो? विशाल समुद्र बघून माझं मन शांत होतं, माझ्या घराजवळ समुद्र असून, मी किती कमी वेळा तिथे जातो, याची मला आज परत एकदा जाणीव झाली. आपण भारतीय करोडो रुपये खर्च करतो, मालदीव्स, फुकेट, पटाया, कराबी, मॉरिशस, सीसेल्स, बाली इंडोनेशिया चे Beach बघण्यासाठी. पण आपल्यातले किती लोकं गोकर्णला गेले आहेत, गोव्याच्या पोलोलीम, बागा, अंजूना, केरळच्या वर्कला बीच, कोवलम बीच. आपल्या कोकणात किती सुंदर समुद्रकिनारा आहे. पण नाही आपल्याला आपल्यापेक्षा फॉरेन जास्त आवडतं. २०२५ मध्ये तीन कोटी भारतीय थायलंड आणि मॉरिशसला बीच एन्जॉय करायला गेले होते, त्यातले काही टक्के जर भारतात फिरायला गेले तर भारतीय टुरिझम इकॉनोमी ला किती फायदा होईल.'' दरम्यान, मिलिंद गवळी कायमच त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. सध्या ते वचन दिले तू मला या मालिकेत झळकत आहेत.