“मित्रांकडून पैसे उधार घेतले, कष्टाने पहिलं घर...”; ‘ते’ दिवस आठवून अभिनेता झाला भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 20:17 IST2025-04-13T20:16:56+5:302025-04-13T20:17:16+5:30
Maniesh Paul : अभिनेत्याने मुंबईत आल्यानंतर खूप संघर्ष केला आहे. आज तो ज्या पदावर पोहोचला आहे तो प्रवास त्याच्यासाठी अजिबात सोपा नव्हता.

“मित्रांकडून पैसे उधार घेतले, कष्टाने पहिलं घर...”; ‘ते’ दिवस आठवून अभिनेता झाला भावुक
अभिनेता मनीष पॉलने मुंबईत आल्यानंतर खूप संघर्ष केला आहे. आज तो ज्या पदावर पोहोचला आहे तो प्रवास त्याच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. मनीष कॉमेडियन भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये आला होता. अभिनेता तेव्हा त्याच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढून खूप भावनिक झालेला पाहायला मिळाला. त्याला अश्रू अनावर झाले.
“जेव्हा मला मुलगी झाली तेव्हा मला घर खरेदी करायचं होतं मी घर विकत घेतलं, पण EMI चा भार माझ्यावर आला. पण देवाने मला खचू दिलं नाही. मला अजूनही आठवतंय की आम्ही दोघांनी मिळून ते घर कसं खरेदी केलं होतं. आम्ही आमच्या काही मित्रांकडून पैसे उधार घेतले होते.”
“नवीन घरात काम सुरू असल्याने आम्ही राहत असलेल्या घराचं भाडं कसं भरायचं हा आम्हाला प्रश्न पडत होता. आजपर्यंत, माझ्या आयुष्यात जे काही चढ-उतार आले तेव्हा मी भारतीला फोन केला आहे. ती नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. तिने नेहमीच मला साथ दिली आहे” असं मनीषने म्हटलं आहे. हे सांगताना मनीष खूप रडू लागला.
मनिष भावुक होताच भारतीनेही तिच्या भावना व्यक्त केल्या. “मनीष आणि मी एकत्र चांगले आणि वाईट दिवस पाहिले आहेत. आम्ही दोघेही एकमेकांकडून पैसे घ्यायचो. जेव्हा मी मनीषला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो माझा क्रश होता, पण नंतर इंडस्ट्रीत आल्यानंतर तो माझा भाऊ बनला” असं भारतीने म्हटलं आहे.