"माझ्या मुलीने घटस्फोटाची न्यूज पाहिली आणि...", जयसोबत वेगळं होण्याच्या चर्चांवर माही विज संतापली, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 13:11 IST2025-11-01T13:10:24+5:302025-11-01T13:11:12+5:30
लग्नानंतर १४ वर्षांनी माही आणि जय घटस्फोट घेत वेगळे होत असल्याचं बोललं जात होतं. त्याबरोबरच त्यांच्या तीन मुलांच्या कस्टडीबाबत निर्णय झाल्याचं वृत्त होतं. यावर माहीने स्पष्टीकरण देत या केवळ अफवा असल्याचं सांगतिलं होतं. आता माफीने तिच्या युट्यूब चॅनेलवरुन व्हिडीओ शेअर करत वैयक्तिक आयुष्यात दखल न देण्याची विनंती केली आहे.

"माझ्या मुलीने घटस्फोटाची न्यूज पाहिली आणि...", जयसोबत वेगळं होण्याच्या चर्चांवर माही विज संतापली, म्हणाली...
गेल्या काही दिवसांपासून टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल असलेल्या माही विज आणि जय भानुशाली यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. लग्नानंतर १४ वर्षांनी माही आणि जय घटस्फोट घेत वेगळे होत असल्याचं बोललं जात होतं. त्याबरोबरच त्यांच्या तीन मुलांच्या कस्टडीबाबत निर्णय झाल्याचं वृत्त होतं. यावर माहीने स्पष्टीकरण देत या केवळ अफवा असल्याचं सांगतिलं होतं. आता माफीने तिच्या युट्यूब चॅनेलवरुन व्हिडीओ शेअर करत वैयक्तिक आयुष्यात दखल न देण्याची विनंती केली आहे.
या व्हिडीओत माही म्हणते, "मी या व्हिडीओत एका गंभीर विषयावर भाष्य करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की गेल्या ३-४ दिवसांपासून एक न्यूज सगळीकडे फिरत आहे. मला हे पाहून खूप दु:ख होतंय. तुमच्याकडे खरंच पुरावे असतील तर तुम्ही बोला. म्हणून मी आज माझ्याच चॅनेलवरुन हे सांगत आहे. मला याबद्दल बोलायचंही नव्हतं. पण, कमेंट आणि लाइक्ससाठी लोक कोणत्या थराला जातात हे मला माहीत आहे. मी कुठेतरी हेदेखील वाचलं की मी घटस्फोटाच्या पेपरवर सही केली. मला ते कागद तुम्ही दाखवा की मी कुठे सही केली आहे. जोपर्यंत आम्ही काही बोलत नाही तोपर्यंत आमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काहीही बोलण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही".
"मी एक आई आहे मला तीन मुलं आहेत. ज्यापैकी दोघांना या गोष्टी समजतात. माझ्या मुलीने मला मेसेज केला की आई हे काय घडतंय? मुलांना याबाबत प्रश्न पडतात. त्यामुळे आमच्या खाजगी आयुष्यात दखल देऊ नका. आम्हाला जसं जगायचं आहे तसं जगू द्या. सेलिब्रिटी होण्याचा असा अर्थ नाही की मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन. मला माझ्या आयुष्यातील जेवढं तुम्हाला सांगायचंय तेवढंच मी सांगेन. माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. आजकाल मुलांकडेही फोन आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो. तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही फक्त लाइक्ससाठी या गोष्टी करता", असंही माहीने म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "एकीकडे मी हेदेखील वाचलं की माहीने ५ कोटी पोटगी मागितली. मी तुम्हाला हे सांगायला आलेले का? आमच्या मुलांबद्दल बोललं गेलंय. आमची मुलं तुम्ही सांभाळायला येणार आहात का? जोपर्यंत आम्ही काही सांगत नाही. तोपर्यंत या गोष्टींवर प्लीज विश्वास ठेवू नका. हे फक्त सोशल मीडियासाठी सुरू आहे. मी सगळ्यांना विनंती करते की आम्हाला प्रायव्हसी द्या. जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत गोष्टी शेअर करू. जय माझं कुटुंब आहे. तो एक चांगला वडील आणि व्यक्ती आहे". जय आणि माहीने २०११ मध्ये लग्न करत संसार थाटला. माही आणि जयने २०१७मध्ये खुशी आणि राजवीर ही दोन मुले दत्तक घेतली. त्यानंतर २०१९मध्ये माहीने तारा या त्यांच्या मुलीला जन्म दिला.