'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये होणार तेनाली रामाची एन्ट्री, मजेशीर प्रोमो पाहून आवरणार नाही हसू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:04 IST2024-12-13T15:02:36+5:302024-12-13T15:04:01+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये तेनाली रामा येणार आहे. या शोचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये होणार तेनाली रामाची एन्ट्री, मजेशीर प्रोमो पाहून आवरणार नाही हसू
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय शो आहे. महाराष्ट्रातील घराघरात या शोचे चाहते आहेत. अगदी आवडीने हा कार्यक्रम पाहिला जातो. हास्यजत्रेतील कलाकार त्यांच्या तल्लख विनोदबुद्धीने अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतात. काही दिवस ब्रेक घेतल्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या नव्या सीझनमध्ये अनेक सरप्राइज चाहत्यांना मिळणार आहेत.
हास्यजत्रेच्या नव्या सीझनमध्ये काही नव्या कलाकारांची एन्ट्री झाल्याचं आपण बघितलं. अभिनेत्री अमृता देशमुखही पाहुणी कलाकार म्हणून या शोमध्ये दिसणार आहे. तर आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये तेनाली रामा येणार आहे. या शोचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये तेनाली रामाची भूमिका साकारणारा अभिनेता कृष्णा भारद्वाज दिसत आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या येणाऱ्या भागात कृष्णा दिसणार आहे. हास्यजत्रेच्या कलाकारांबरोबर कृष्णा स्किटमध्येही सहभाग घेणार आहे.
'तेनाली रामा' ही छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका आहे. २०१७ ते २०२० या काळात 'तेनाली रामा'चा पहिला सीझन प्रसारित करण्यात आला होता. या मालिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं. आता 'तेनाली रामा'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १६ डिसेंबरपासून रात्री ८ वाजता 'तेनाली रामा' सोनी टीव्हीवर प्रेक्षकांना बघता येणार आहे.