'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकरने दिली गुड न्यूज; चाहत्यांनी केलं अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:43 IST2025-11-27T12:36:47+5:302025-11-27T12:43:37+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकरने सर्वांना खास आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे प्रियदर्शिनीच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकरने दिली गुड न्यूज; चाहत्यांनी केलं अभिनंदन
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांच्या आवडीचा शो. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसतात. हास्यजत्रेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत. या कलाकारांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर 'हास्यजत्रे'व्यतिरिक्त सिनेमा, नाटकांमध्येही काम केलंय. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने प्रेक्षकांना एक खास गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय.
प्रियदर्शिनीने दिली आनंदाची बातमी
प्रियदर्शिनीने तिच्या आयुष्यातील एका नव्या आणि रोमांचक प्रवासाची घोषणा केली आहे. तिने आपला स्वतःचा युट्यूब चॅनेल 'Sounds Good Shini' सुरू केला आहे. हा चॅनेल तिच्यासाठी 'प्रयोग आणि नवीन संशोधनाची जागा' असणार आहे. या युट्यूब चॅनलवर नवीन गोष्टी, संकल्पना, कल्पना ती राबवणार आहे.
प्रियदर्शनीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "चला एकत्र 'जादू' निर्माण करूया! गेली अनेक वर्षे अभिनयाव्यतिरिक्त इतर क्रिएटिव्ह बाजूंशी माझा संपर्क नव्हता, त्यामुळे स्वतःचा युट्यूब चॅनेल सुरू करण्याचा अनुभव खूप आनंददायी असल्याची भावना तिने व्यक्त केली. हा चॅनेल सुरू करण्याची कोणतीही योजना नव्हती, पण काही निर्णय मनात घर करून राहिले होते आणि सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून हे शक्य झाले.
चॅनेलच्या या प्रवासात मदत करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या काही खास लोकांचे प्रियदर्शिनीने वैयक्तिकरित्या आभार मानले आहेत. ''निमिश जोशी, तू या प्रवासात माझ्यासोबत आल्याबद्दल आणि माझ्या उत्स्फुर्त कामाला सांभाळून घेतल्याबद्दल धन्यवाद. विराजस कुलकर्णी, तू किती व्यस्त असतोस हे सगळ्यांना माहीत आहे, तरीही तू वेळ काढलास! आम्हाला आमचा 'क्युट' लोगो दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. क्षितीश दाते, एक चांगलं नाव शोधणं खरंच एक आव्हान होतं! अनेक नावं सुचवल्यानंतर अखेरीस आम्हाला 'Sounds Good Shini' हे नाव मिळालं. हे नाव सुचवल्याबद्दल धन्यवाद. रोशन नागवडे, मला हे करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल तुझे खूप आभार!''
''याव्यतिरिक्त, 'Sounds Good Shini' शी जोडलेल्या प्रत्येकाचे आणि ज्या मित्रांनी आपले छोटे व्हिडिओ पाठवून सहकार्य केले, त्या सर्वांचे आमच्या टीमच्या वतीने मी आभार मानते. "ठीक आहे मग, चला सुरुवात करूया!'', असं कॅप्शन लिहून प्रियदर्शिनीने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. प्रियदर्शिनीने ही गुड न्यूज देताच सर्वांनी तिचं अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.