आपली कोकणची कला! गणेशोत्सवासाठी 'हास्यजत्रा' फेम अभिनेता पोहोचला मूळगावी, दाखवली शक्तीतुरा कार्यक्रमाची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 10:34 IST2025-09-04T10:28:59+5:302025-09-04T10:34:46+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने दाखवली शक्तीतुरा कार्यक्रमाची झलक, नेटकरी म्हणाले- "आपली परंपरा..."

आपली कोकणची कला! गणेशोत्सवासाठी 'हास्यजत्रा' फेम अभिनेता पोहोचला मूळगावी, दाखवली शक्तीतुरा कार्यक्रमाची झलक
Nikhil Bane: सध्या संपूर्ण देशभरात गणेशोत्सवानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे प्रत्येक कोकणवासी अगदी न चुकता गावाची वाट धरतात. यंदा सर्वसामान्यांप्रमाणे बऱ्याच कलाकारांनी गणेशोत्सवासाठी कोकण गाठलं आहे.कोकणातील माणूस हा गणेशोत्सवात मनसोक्त मजा करतो. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बने आपल्या कुटुंबीयांसह गणेशोत्सावासाठी गावी गेला आहे. अलिकडेच त्याने निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या त्याच्या गावाच्या घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर आता त्याने आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्याच्या मनाचा ठाव घेतला आहे.
निखिल बने हा मुळचा चिपळूणचा आहे. कापरे-बनेवाडी हे त्याच्या गावाचं नाव आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तो गौरी-गणपतीच्या सणाला गावी गेलाय.कोकणात जसं गणेशोत्सवाचं महत्व अधिक आहे.तसेच गणेशोत्सवात शक्तीतुरा नृत्याचे महत्त्व आहे.शक्तीतुरा हे कोकणच्या संस्कृतीचे ठसकेबाज वैशिष्ट्य म्हणावे लागेल.नुकताच निखिलने सोशल मीडियावर पारंपरिल लोककलेचं दर्शन घडवणारा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
निखिल बनेच्या घरी बाप्पाचं आगमन झाल्यानंतर या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्याच्या घराच्या अंगणात शक्तीतुरा हा कार्यक्रम सादर करण्यात आला आहे, याची झलक निखिलने या व्हिडीओमध्ये दिसते आहे. "आपली कोकणची कला..."असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. दरम्यान, निखिल बने याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. "आपली परंपरा आपणच जपुया...", अशी कमेंट एका नेटकऱ्याने या व्हिडीओवर करत भावना व्यक्त केल्या आहेत.