'क्योंकी सास भी कभी बहू थी'मधील अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; रवी पुजारी टोळीतील सदस्याने पाठवले मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 11:32 IST2025-10-10T11:27:07+5:302025-10-10T11:32:12+5:30
मोठी बातमी! 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मधील लोकप्रिय अभिनेत्याला धमकीचे मेसेज आले आहेत. धमकी देणारा अज्ञात व्यक्ती हा रवी पुजारी टोळीचा सदस्य असल्याचं सांगितलं जातंय

'क्योंकी सास भी कभी बहू थी'मधील अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; रवी पुजारी टोळीतील सदस्याने पाठवले मेसेज
टीव्ही मालिका 'सास भी कभी बहू थी'मध्ये मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश जे. भारती आणि त्यांच्या पत्नी अन् चित्रपट निर्मात्या मंजू मुकेश भारती यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गाझियाबादमध्ये आगामी चित्रपटांचं शूटिंग केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी त्यांना एका अज्ञात व्यक्तीकडून मिळाली आहे. धमकी देणाऱ्याने स्वतःला कुख्यात गुंड रवी पुजारी टोळीचा सदस्य असल्याचं सांगितलं आहे.
गाझियाबादमध्ये शूटिंग केल्यास जीवे मारण्याची धमकी
अभिनेते मुकेश भारती आणि त्यांची पत्नी मंजू भारती या 'विवेक फिल्म प्रोडक्शन हाऊस'च्या मालक आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात 'मौसम इकरार के दो पल प्यार के', 'प्यार में थोडा ट्वीस्ट' यांसारख्या चित्रपटांचे शूटिंग केले आहे. आगामी काळातही ते याच भागात 'पापा की परी' आणि 'रिकव्हरी' या दोन चित्रपटांचं शूटिंग करण्याची तयारी करत आहेत.
या शूटिंगच्या तयारीची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर नंदग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने त्यांना फोन आणि सोशल मीडियाद्वारे धमक्या देण्यास सुरुवात केली. गाझियाबादमध्ये शूटिंग केल्यास तुम्हाला आम्ही जावे मारु, अशी धमकी त्या अज्ञात इसमाने मुकेश यांना दिली. या आरोपीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही धमक्यांचे मेसेज पाठवले आहेत.
पोलीस आयुक्तांकडे तक्रार, सुरक्षेची मागणी
यामुळेच मुकेश भारती आणि मंजू भारती यांनी गाझियाबादचे पोलीस आयुक्त जे. रविंदर गौड यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली आहे. आरोपी सातत्याने त्यांना आणि त्यांच्या मुलाला अपहरण करण्याची धमकी देत आहे. या गंभीर तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांनी त्यांना तातडीने सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, उत्तर प्रदेश सरकारने चित्रपट कलाकारांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले असल्याने भारती दाम्पत्याला संपूर्ण सुरक्षा दिली जाईल आणि आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कोण आहे रवी पुजारी?
रवी पुजारी हा कुख्यात गुंड असून, बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांना धमक्या दिल्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. मुकेश भारती यांनी तक्रारीत उल्लेख केला आहे की, रवी पुजारी टोळीने यापूर्वी सलमान खान, शाहरुख खान, रितेश देशमुख, महेश भट्ट, संजय कपूर, बोनी कपूर, यश चोप्रा, करण जोहर, अक्षय कुमार आणि फरहान अख्तर यांसारख्या कलाकारांनाही खंडणीसाठी धमकावले होते. अभिनेता आणि निर्माते असलेल्या मुकेश भारती यांना लवकरच 'पापा की परी' आणि 'रिकव्हरी' या चित्रपटांमध्ये पाहता येईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.