कुशल बद्रिकेचा प्राजक्ता माळीला जाहीर पाठिंबा; पोस्ट करत म्हणाला, "काळजात 'धस' होतंय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 14:29 IST2024-12-29T14:28:50+5:302024-12-29T14:29:28+5:30
"मीही परळीला गेलोय , नाचताना कंबर हलवली आहे, पण ते शहर....", कुशल बद्रिकेची लक्षवेधी पोस्ट

कुशल बद्रिकेचा प्राजक्ता माळीला जाहीर पाठिंबा; पोस्ट करत म्हणाला, "काळजात 'धस' होतंय..."
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे. दरम्यान अनेकजण यावरुन आरोप प्रत्यारोप करत आहे. मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर तर थेट आरोप लावण्यात आले आहेत. धनंजय मुंडेंचं नाव येताच पाठोपाठ काही अभिनेत्रींची नावंही गोवली जात आहेत. कालच भाजपा आमदार सुरेश धस यांनी परळी पॅटर्न म्हणत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरीचं नाव घेतलं. यानंतर मात्र प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) संताप व्यक्त करत महिला आयोगात तक्रार दाखल केली. तसंच पत्रकार परिषद देत राजकारण्यांची कानउघाडणीही केली. आता मनोरंजनविश्वातून अनेकजण प्राजक्ताला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. तिचं चारित्र्यहनन होताना बघून अनेक कलाकारांनी संतप्त पोस्ट केली आहे. हास्यजत्रेचे लेखक सचिन गोस्वामी यांच्या पोस्टनंतर आता कुशल बद्रिकेनेही (Kushal Badrike) प्राजक्ताला पाठिंबा दिला आहे. जाहीर निषेध असं ठळक अक्षरात फोटो टाकत त्याने लिहिले, "कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा ३/४ वेळा परळीला गेलोय, काय ते परळी पॅटर्न का काय म्हणतात तशी मी सुध्दा नाचताना कंबर हलवली पण मला त्याचं कधी काही वाटलं नाही, वाटलं किती छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहे. पण आता मात्र “धस “ होतय काळजात, कुणास ठाऊक स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेत सुद्धा एखाद्याला इंटरेस्ट यावा. बीडमध्ये झालेल्या खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध!!
प्राजक्ता मी तुझ्या सोबत आहे."
कुशल बद्रिकेने 'पांडू'या सिनेमात प्राजक्तासोबत काम केलं होतं. काल प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सर्व इंडस्ट्रीतील कलाकारांचा तिला पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. तसंच कलाकार महिलेवर राजकारण्यांनी असे आरोप लावणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असंही तिने खडसावून सांगितलं. आतापर्यंत सचिन गोस्वामी, सुशांत शेलार, पृथ्वीक प्रताप आणि आता कुशल बद्रिकेने तिला जाहीर पाठिंबा दिला आहे.