"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 09:02 IST2025-09-03T09:01:07+5:302025-09-03T09:02:44+5:30
माझ्या इन्स्टाग्राम मेसेजमध्ये मला माझे बोल्ड व्हिडिओ पाठवतात अन् घाणेरड्या भाषेत टीका करतात, आईवडिलांनाही पाठवतात; अभिनेत्री म्हणाली...

"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
'एक हजारो मे मेरी बहना है' फेम अभिनेत्री क्रिस्टल डिसुझाला (Krystle Dsouza) सर्जरी, बोल्ड सीन्स यावरुन प्रंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षी आलेल्या 'विस्फोट' सिनेमात तिने फरदीन खानसोबत इंटिमेट सीन दिले होते. त्यानंतर 'फितरत'या वेबसीरिजमध्येही तिने किसींग सीन दिले. क्रिस्टलच्या या इंटिमेट सीन्सचे व्हिडिओ अनेकजण तिला पाठवतात आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ करतात. इतकंच त्यांनी तर तिच्या आईबाबांच्या इन्स्टाग्राम मेसेजवर व्हिडिओ पाठवत त्यांनाही सुनावतात. आता नुकतंच एका मुलाखतीत क्रिस्टलने संताप व्यक्त केला आहे.
बोटॉक्स सर्जरीवरुन झाली ट्रोल
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत क्रिस्टल म्हणाली, "जर कोणाला नाकाची सर्जरी करायची असेल तर त्यांनी करावी. जर नसेल करायची तर नका करु. हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. मी कधीच सर्जरी केलेली नाही. पण बेसिक ग्रुमिंग जसं की फेशियल, फिलर्स जे काही मला थोडा आत्मविश्वास देईल ते केलं आहे. जर मी माझ्याच नजरेत चांगली दिसू शकते तर याच्याशी तुमचं काहीही घेणं देणं नाही. ना यात तुमचा पैसा किंवा वेळ आहे आणि ना तुमच्या शरिराचा संबंध आहे. हे माझं आहे. त्यामुळे माझे आधीचे आणि नंतरचे फोटो पोस्ट करत स्वत:चा वेळ घालवू नका. जर हवे असतील तर मी स्वत:च तुम्हाला ते फोटो देईन. माझ्याकडे बरेच फोटो आहेत."
सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर क्रिस्टल म्हणाली, "हो, मी काही सिनेमांमध्ये, सीरिजमध्ये बोल्ड सीन केले आहेत. लोक तेवढेच सीन कट करुन माझ्या इन्स्टाग्रामवर मेसेज करतात. घाणेरड्या भाषेत टीका करतात. मी त्यांच्या प्रोफाईलवर जाऊन पाहते तेव्हा कळतं की या माणसाला पत्नी, एक मुलगी आहे आणि तरी सुद्धा तो अशा भाषेत मला मेसेज करतोय. मी जर हा स्क्रीनशॉट शेअर केला तर काय होईल? मी त्यांच्या कुटुंबाला बर्बाद करु शकते. तुम्ही माझ्या मानसिकतेशी का खेळत आहात? तुमची हिंमत कशी होते? तुम्ही जे मला पाठवत आहात ते मी तुमच्या पत्नीला पाठवू शकते. पण नंतर त्यांच्या लेकीचा विचार येतो. हे खूपच दु:खद आहे. "
ती पुढे म्हणाली, "माझ्यावर या सगळ्याचा खूप परिणाम होतो. माझे आई वडीलही सोशल मीडियावर आहेत. लोक त्यांनाही मेसेजमध्ये माझे व्हिडिओ पाठवतात. मग हे जेव्हा मला त्यांच्याकडून समजतं तेव्हा मला आणखी दु:ख होतं. मी तो सिनेमा केला आहे, तो सीन केला आहे तुम्ही त्यांना का सांगत आहात? पण लोकांना माहितीये की एखाद्याला नक्की कशा वेदना द्यायच्या असतात याचं जास्त वाईट वाटतं. पण आता मला किंवा माझ्या आईवडिलांना यामुळे फरक पडत नाही."