Tu Tevha Tashi : सोशल मीडियावर ‘चंदू चिमणे’ची हवा, तो आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 08:00 IST2022-03-29T08:00:00+5:302022-03-29T08:00:06+5:30
Tu Tevha Tashi : ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत शिल्पा तुळसकर, स्वप्नील जोशी, अभिषेक रहाळकर, अभिज्ञा भावे आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय चंदू चिमणे हा सुद्धा या मालिकेतील एक महत्त्वाचा दुवा आहे.

Tu Tevha Tashi : सोशल मीडियावर ‘चंदू चिमणे’ची हवा, तो आहे तरी कोण?
स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘तू तेव्हा तशी’ ( Tu Tevha Tashi ) ही नवी मालिका नुकतीच सुरू झाली आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली.चाळीशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिकाची फ्रेश व युथफूल प्रेमकहाणी या मालिकेत प्रेक्षकांना पहायला मिळतेय. मालिकेत शिल्पा तुळसकर, स्वप्नील जोशी, अभिषेक रहाळकर, अभिज्ञा भावे, सुनील गोडबोले, उज्वला जोग, सुहास जोशी आणि मीरा वेलणकर आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय चंदू चिमणे हा सुद्धा या मालिकेतील एक महत्त्वाचा दुवा आहे.
अनामिका आणि तिचा कॉलेजचा मित्र चंदू चिमणे याची पहिल्याच भागात भेट होते. या चंदू चिमणेची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. प्रेक्षकांना चंदू चिमणे चांगलाच आवडला आहे. आता हा चंदू चिमणे कोण, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चंदू चिमणेची भूमिका साकारणारा हा अभिनेता कोण तर त्याचं नाव किरण भालेराव (Kiran Bhalerao). आज त्याच्याचबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कॉलेजमध्ये असताना किरणला अभिनय खुणावू लागला. पण कॉलेज संपलं तशी बँकेची नोकरी चालून आली. अभिनय ही आवड बाजूला ठेवून किरणने बँकेची नोकरी धरली. पण 10 ते 5 नोकरीत त्याचं मन रमेना. अभिनयाची आवड स्वस्थ बसू देईना. नोकरी करून अभिनयाची आवड जोपासावी म्हटली तर रजा मिळेना. एकदा एका ऑडिशनसाठी किरणला अमरावतीत बोलवलं होतं. पण रजा मागायची कशी? रजेसाठी कारण द्यायचं तरी काय? असा प्रश्न त्याला पडला. पण त्याचक्षणी किरणने निर्णय घेतला. थेट नोकरीचा राजीनामा देऊन तो अभिनयाकडे वळला. मग त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
2009 साली झी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोमध्ये तो सहभागी झाला. या शोमुळे किरणला अमाप प्रसिद्धी मिळाली. पुढे ‘गणपती बाप्पा मोरया’या मालिकेत त्याला नंदी महाराजांची भूमिका मिळाली. ‘बाजी’ या आणखी एका मालिकेतून तो खंडेराव सरदारची भूमिका साकारताना दिसला.
पुढे जिवलगा, सोनी सबवरील मंगलम दंगलम अशा अनेक मालिकेतून त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून किरण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याची चंदू चिमणेची भूमिका देखील प्रेक्षकांना भावली आहे.