किचन कल्लाकार: तृप्ती देसाई- अभिजीत बिचुकले आमनेसामने; किचनमध्ये रंगणार पाककलेचं युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 14:51 IST2022-06-14T14:51:10+5:302022-06-14T14:51:48+5:30
Kitchen kalakar: बिग बॉसच्या घरात एकमेकांचे मित्र असलेले हे दोघं किचन कल्लाकारच्या मंचावर एकमेकांच्या समोर उभे राहणार आहेत.

किचन कल्लाकार: तृप्ती देसाई- अभिजीत बिचुकले आमनेसामने; किचनमध्ये रंगणार पाककलेचं युद्ध
अभिजीत बिचुकले (abhijit bichukle) आणि तृप्ती देसाई (trupti desai) ही दोन नावं महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तींसाठी नवीन नाहीत. बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून दोघांनी एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. तृप्ती देसाई त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि महिलांच्या हक्कासाठी लढा देण्यासाठी ओळखल्या जातात. तर, अभिजीत बिचुकले कायम वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चिले जातात. विशेष म्हणजे सातत्याने चर्चेत येणाऱ्या या दोन व्यक्ती आता आमनेसामने उभ्या राहणार आहेत.
राजकीय वर्तुळासह कलाविश्वात चर्चेत राहणाऱ्या या दोन व्यक्ती लवकरच किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात एकमेकांचे मित्र असलेले हे दोघं किचन कल्लाकारच्या मंचावर एकमेकांच्या समोर उभे राहणार आहेत.
किचन कल्लाकारच्या येत्या भागात तृप्ती देसाई, अभिजीत बिचुकले आणि जयवंत वाडकर ही दिग्गज मंडळी झळकणार आहेत. या मंचावर हे तिघेही नवनवीन पदार्थ करुन महाराजांना खूश करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे या तिघांमध्ये पाककलेचं युद्ध रंगणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, येत्या १५ जून रोजी हा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे किचन कल्लाकारच्या मंचावर हे तिघे जण नेमका कोणता पदार्थ करतात याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.