'त्याच्या जीवावर पोट भरलं आहे'; केदार शिंदेंच्या पडत्या काळात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम या कलाकाराने दिली होती साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 19:47 IST2023-05-07T19:44:54+5:302023-05-07T19:47:18+5:30
Kedar shinde: केदार शिंदे स्ट्रगल करत असताना या कलाकाराने त्यांना शक्य होईल तितकी मदत केली

'त्याच्या जीवावर पोट भरलं आहे'; केदार शिंदेंच्या पडत्या काळात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम या कलाकाराने दिली होती साथ
मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवणारे केदार शिंदे(kedar shinde) सध्या त्यांच्या महाराष्ट्र शाहीर या सिनेमामुळे चर्चेत येत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या लेकीने सना शिंदे हिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगत असतानाच केदार शिंदे यांनी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे.
केदार शिंदे सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असून ते कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. यामध्येच त्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एका कलाकाराविषयी पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी या कलाकारामुळेच आज मी आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
“बरेच दिवस झाले या आमच्या मित्राविषयी, म्हणजे सर्वांचा लाडका दादुस अरुणविषयी, लिहायचं होतं. पण जमलंच नाही. ‘महाराष्ट्र शाहीर’च्या प्रमोशनसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये गेलो होतो. त्या वेळचा हा खास फोटो. अरुण आणि माझी मैत्री १९९० पासून. माझ्या अनंत सुखदुःखांत तो महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. आमच्या सगळ्यांमध्ये लवकर सेटल होणारा, घसघशीत कमाई करणारा पहिला अरुणच. आर्थिक विवंचना असल्यावर हातात पैसे ठेवणारा अरुणच,” असं केदार शिंदे म्हणाले.
पुढे ते म्हणतात, “कित्येक दिवस मी त्याच्या बीएमसी ॲाफिसात काढले आहेत. त्याच्या जीवावर पोट भरलं आहे. आमच्यात वयाने खूप मोठा, पण त्याची मस्करी करताना ते कधीच डोक्यात येत नाही. गण-गवळण, बतावणी आम्ही दोघं ‘लोकधारा’मध्ये सादर करायचो. त्याच्या डोळ्यात दिसायचं की, पुढचं वाक्य तो विसरला आहे. पण आविर्भाव असा असायचा की, समोरचा वाक्य विसरला आहे. आता आम्ही एकत्र फार काम करत नाही. पण त्याची प्रगती पाहून अभिमान वाटतो. आत्ताच्या पिढीतील मुलांसोबत तो त्याच ऊर्जेने काम करतो हे पाहून मन भरून येतं. खूप शुभेच्छा अरुण.”
दरम्यान, केदार शिंदे यांनी अरुण कदम (arun kadam) यांच्यासाठी लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे. या पोस्टवरुन त्यांची खोल मैत्री दिसून येते.