KBC 17: इंदिरा गांधींशी संबंधित १२ लाख ५० हजारांचा प्रश्न; स्पर्धकाचं उत्तर चुकलं, तुम्हाला माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 15:25 IST2025-09-04T15:25:19+5:302025-09-04T15:25:59+5:30
इंदिरा गांधी यांच्या आयुष्याशी संबंधित एक प्रश्न 'केबीसी १७'मध्ये विचारण्यात आला. परंतु स्पर्धकाचं उत्तर चुकलं. तुम्हाला माहितीये का योग्य उत्तर

KBC 17: इंदिरा गांधींशी संबंधित १२ लाख ५० हजारांचा प्रश्न; स्पर्धकाचं उत्तर चुकलं, तुम्हाला माहितीये?
'कौन बनेगा करोडपती' (KBC) हा शो नेहमीच चर्चेत असतो. आता 'केबीसी १७'च्या या पर्वातील एका स्पर्धकामुळे हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मॅनेजमेंट क्षेत्राशी संबंध असलेले अमेय विनायक देशपांडे हॉट सीटवर बसले होते. त्यांनी आतापर्यंत ५ लाख रुपये जिंकले होते आणि ते १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचले होते. मात्र त्या प्रश्नाचं उत्तर देता न आल्याने त्यांना खेळातून माघार घ्यावी लागली. काय होता तो प्रश्न?
१२.५० लाखांचा प्रश्न काय होता?
अमिताभ बच्चन यांनी अमेयला १२ लाख ५० हजार रुपयांसाठी प्रश्न विचारला. हा प्रश्न पुढीलप्रमाणे-- "कोणत्या संगीतकाराला श्रीमती इंदिरा गांधी यांनी अन्नपूर्णा देवी यांचं गाणं ऐकण्यासाठी मदत केली होती?" या प्रश्नासाठी पर्याय होते: A. एल्टन जॉन B. ओझी ऑस्बोर्न C. जॉर्ज हॅरिसन D. पॉल मॅकार्टनी अमेयला या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते. चुकीचे उत्तर दिल्यास जिंकलेली रक्कम कमी होईल, या भीतीने अमेयने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
खेळ सोडल्यानंतर उत्तराचा अंदाज सांगताना अमेयने 'ओझी ऑस्बोर्न' हे उत्तर दिलं. हे उत्तर चुकीचं होतं. या प्रश्नाचे योग्य उत्तर 'जॉर्ज हॅरिसन' होते. अमेयने याआधी 'सुपर संदूक' या फेरीत ४० हजार रुपये जिंकले होते. याशिवाय ५०-५० लाईफलाईनच्या मदतीने अमेयने ७ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिले होते. अखेरीस, त्याला खेळ सोडावा लागला, पण त्याने ७ लाख ५० हजार रुपयांची मोठी रक्कम जिंकली. अमेयने खेळ सोडल्यानंतर रसायनशास्त्राच्या शिक्षिका मीनाक्षी यादव हॉट सीटवर नवीन स्पर्धक म्हणून बसल्या.