"गोड लपवून खायची आणि पुण्यावरुन येताना.."; सायलीची पूर्णा आजीसाठी भावुक पोस्ट, तुमचेही डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 10:18 IST2025-08-18T10:17:26+5:302025-08-18T10:18:35+5:30

जुई गडकरीने ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहताना अनेक खुलासे केले आहेत. वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

jui gadkari emotional post on jyoti chandekar death from tharla tar mag actress | "गोड लपवून खायची आणि पुण्यावरुन येताना.."; सायलीची पूर्णा आजीसाठी भावुक पोस्ट, तुमचेही डोळे पाणावतील

"गोड लपवून खायची आणि पुण्यावरुन येताना.."; सायलीची पूर्णा आजीसाठी भावुक पोस्ट, तुमचेही डोळे पाणावतील

'ठरलं तर मग' मालिकेतील पूर्णा आजी अर्थात अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्याने सर्वांना धक्का बसला. 'ठरलं तर मग' मालिकेतील ज्योती यांची सहकलाकार अभिनेत्री जुई गडकरीने भावुक पोस्ट लिहिली आहे. जी वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल, "तशी तिची आणि माझी पहिली भेट २०१० साली बाजीराव मस्तानी या मालिकेच्या सेटवर झाली.. आम्ही एकाच मेकपरुम मध्ये बसायचो.. तिची काम करण्याची पद्धत बघुन मी हुरळुन गेले होते.. आळवणात ही कोण ईतकं सुंदर कसं दिसु शकतं असा प्रश्न पडायचा.."

"मग २०२२ साली 'ठरलं तर मग'ला पुन्हा आम्ही भेटलो… आधी आहो ज्योती ताई, मग अगं ज्योती ताई, मग पुर्णाआजी, मग फक्त आजी आणि नंतर “माझी म्हातारी” अशी आमची मैत्री वाढली होती… म्हातारीला सगळ्याची आवड!! माझ्या वयाच्या मुलींनाही लाजवेल अशी छान नट्टापट्टा करायची… छान साड्या, दागिने खास स्वतःचे, नव नवीन कॅासमेटीक्स, जेल पॅालीश ई अशा सगळ्याची तीला खुप आवड!!"

"मला मुळात आजी आजोबा खुप आवडतात.. माझी आजी २०१५ साली गेली.. पण त्यानंतर मला माझ्या म्हातारीत माझी आजी पुन्हा भेटली… तशीच गोड गुबगुबीत.. तीच्या स्पर्शाची एक वेगळी ऊब होती आणि म्हणुन मी सतत तिच्या अंगा अंगाशी करायचे… तिच्या मांडीत बसायचे.. अंगावर रेलुन झोपायचे… तिचे हात धरायचे.. तिला लाडाने माझी नखं लावायचे.. त्यावर ती प्रेमाने मला “आलं माझं मांजराचं पिल्लु” असं म्हणायची…"

"४-४.३० झाले कि तिचा खाऊचा पिटारा ऊघडायची… त्यात काय काय असेल ते सगळ्यांना द्यायची..बरेचदा त्यात चिप्स, चकल्या, शेव ई असायचं.. त्यावरुन माझा रोज ओरडा खायची… गोड माझ्यापासुन लपवून खायची आणि पकडलीच जायची.. कित्येकदा मी तिच्या तोंडातुन भजी, गुलाबजाम बाहेर काढलेत.. पण म्हातारी ऐकायची नाहीच… पुण्यावरुन येताना आवर्जुन सगळ्यांसाठी क्रीमरोल आणायची! एकदा मी तिला जरा जास्तं ओरडले.. जेजे करायचं नाही तेच करतेस असं खुप बोलले… त्यावर मला म्हणाली “मला पंडीतांकडे जायचंय”… आणि मी सुन्न पडले…"

"त्यापुढे मी ना तिला ओरडु शकले ना काही बोलु शकले… कोणाच्या आयुष्यात कसा कुठल्या बाबतीत एकटेपणा असु शकेल काही सांगता येत नाही.. जेवायला आवर्जुन माझ्या शेजारी बसायची.. मग माझ्या डब्यातलं काय असेल ते आवडीने खायची.. “जुया फदफदं आण ना” असं म्हणाली होती आणि मी ते करुन नेल्यावर खासच खुश झाली होती!! तिच्या घरातल्या तिच्या केअरटेकर मावशी तिला रोज डबा द्यायचा! बरं, त्या हिच्यापेक्षा बऱ्याच तरुण तरी त्यांना ही “म्हातारी” म्हणायची!! माझ्याकडचं पेन रीलीफ ॲाईल बरेचदा विकत घ्यायची… पाय सतत सुजलेले असायचे तिचे.. हट्टी होती कधी सेटवर कोणी ओरडलंच तर रडायची ही अगदी लहान मुलासारखी… पण माझी म्हातारी काम काय सुंदर करायची!"

"डायलॅागचं प्रॅांमटींग घेतलं तरी त्यात “जान” भरुन ते डीलीव्हर करायची… कधी करारी तर कधी प्रेमळ असे पटकन तिचे डोळे बदलायचे! तिच्याबरोबर मी खुप सीन केले ज्यात आमचं पर्सनल नातं तयार झालं.. तिच्यात मला माझी आजी दिसायची.. तिचे पाय चेपुन देणाचे सीन तिला भरवण्याचे सीन मी मनापासुन एन्जॅाय करायचे.. माझा पहिला ॲानस्क्रीन पापी घेण्याचा सीन मी तिच्या बरोबरच केला! आणि मग तिच्या सतत पाप्या घेणं, तिला मीठी मारणं हे सीन मध्ये आपसुक व्हायचं… तिच्याबरोबरचे सीन करायला कधी ग्लीसरीन नाही घ्यावं लागलं.."

"मी तिची खुप चेष्टा करायचे पण तिचा मोठेपणा कि तिने ते मनाला कधीच लावून घेतलं नाही… मला तिच्या काठीने फटके द्यायची पण रागावली कधीच नाही.. बरेचदा आजारी असायची.. त्यावर आम्ही तिला म्हणायचो असं म्हण मी बरीए.. मग बरी होशील.. बरेचदा सेटवरुन हॅास्पिटलला नेलं तिला.. पण ती परत यायची.. परत सुंदर दिसायची… मस्ती करायची… याही वेळेला वाटलं होतं तु परत येशील… पुढच्या १० दिवसात आपण ९०० भाग पुर्ण करतोय गं.. अजुन कितीतरी काम करायचं बाकी होतं.. तुझयाकडुन अजुन खुप शिकायचं होतं… तुझ्या व्यतिरिक्त “पूर्णाआजी” म्हणुन दुसऱ्या कोणाला मी कशी एक्सेप्ट करु??"

"तुझी औषधाच्या वासांनी भरलेली खोली.. तुझा रेलीस्रपेचा परफ्युम! हे सगळं आता परत कधीच दिसणार नाही… आजही तुझ्या दागिन्यांनी भरलेले तुझ्या रुमचे ड्रॅाव्हर तसेच लॅाक आहेत आणि कदाचित तसेच राहतील… तुला माझं लग्नं झालेलं बघायचं होतं.. मला म्हणायचीस मा ठणठणीत बरी होऊन येणार तुझ्या लग्नाला… सगळं राहुन गेलं गं.. आपल्या मोनिकाच्या वृंदाला तुझा सहवास लाभला.. आशीर्वाद मिळाला हीच मोठी गोष्टं! अगदी परवा म्हणालीस ना गं मी येते पुण्याला जाऊन…"

"आज तिला स्मशानात असं शांत झोपलेलं बघुन खुप त्रास झाला..एका क्षणात सगळं शांत झालं होतं… कधी कधी रक्ताची नसली तरी अशी नाती असतात जी खुप आनंदही देतात आणि त्रास ही… आजी तुझी ऊणीव कायम भासत राहील… तु परत येते सांगुन परत आलीच नाहीस… आतातरी पंडीताबरोबर शांत.. सुखी राहा.. ॥ॐ शांती॥", अशी पोस्ट लिहून जुई गडकरीने ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title: jui gadkari emotional post on jyoti chandekar death from tharla tar mag actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.