एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 16:04 IST2025-05-02T16:01:46+5:302025-05-02T16:04:43+5:30
House Arrest Ullu App: राष्ट्रीय महिला आयोगाने ULLU अॅपचे CEO विभू अग्रवाल आणि एजाज खानला समन्स बजावले.

एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
House Arrest Ullu App: बिग बॉस फेम एजाज खान (Ajaz Khan) त्याच्या 'हाऊस अरेस्ट' शोमुळे वादात अडकला आहे. या शोमधील काही अश्लील क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या शोविरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय. काही व्हिडिओंमध्ये तर महिला स्पर्धक त्यांचे कपडे काढताना दिसत होत्या. या सर्व अश्लील गोष्टींमुळे हा शो बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. या संपूर्ण प्रकरणावर एजाज खान आणि निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
उल्लू अॅपने सर्व एपिसोड काढले
या शोचे क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. उल्लू अॅपवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप होत आहे. सामान्यांपासून ते अनेक राजकीय व्यक्तींनीही या शोवर निशाणा साधला आणि याला बंद करण्याची मागणी केली. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर ओटीटी प्लॅटफॉर्म Ullu अॅपने हाऊस अरेस्ट शोचे सर्व एपिसोड काढून टाकले आहेत. तसेच, एजाज खानविरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स पाठवले
राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि होस्ट एजाज खान यांना समन्स पाठवले आहेत. दोघांनाही 9 मे पर्यंत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समन्सनुसार, 29 एप्रिल 2025 रोजी शोची एक छोटी क्लिप व्हायरल झाली. यामध्ये एजाज खान महिला स्पर्धकांना विचित्र प्रश्न विचारताना आणि कॅमेऱ्यासमोर अश्लील पोझ देण्यास सांगताना दिसतोय.
आयोगाचे म्हणणे आहे की, अशाप्रकारचा कंटेट केवळ महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात नाही तर मनोरंजनाच्या नावाखाली लैंगिक छळाला प्रोत्साहन देणारा आहे. आरोप सिद्ध झाले, तर ते भारतीय न्याय संहिता, 2023 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येईल. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कठोर शब्दात सांगितले की, महिलांविरुद्ध असलेली, त्यांच्या संमतीकडे दुर्लक्ष करणारी किंवा अश्लीलता पसरवणारा कोणत्याही प्रकारचा कंटेट खपवून घेतला जाणार नाही.
'हाऊस अरेस्ट' शोचे स्पर्धक कोण आहेत?
'हाऊस अरेस्ट' हा शो बिग बॉस आणि लॉकअप शोच्या धर्तीवर तयार करण्यात आला होता. हा सेन्सॉर नसलेला रिअॅलिटी शो असल्याचे सांगण्यात आले. गेहना वशिष्ठ, नेहल वडोदिया आणि आभा पॉल या बोल्ड अभिनेत्रींव्यतिरिक्त, हुमेरा शेख, सारिका साळुंके, मुस्कान अग्रवाल, रितू राय, आयुषी भौमिक, सिमरन कौर, जोनिता डिक्रूझ आणि नैना छाब्रा या शोचा भाग होत्या. पुरुष स्पर्धकांमध्ये राहुल भोज, संकल्प सोनी आणि अक्षय उपाध्याय या नवोदितांना घेतले होते.