Video: "जयाजींना तुमच्या फोनचा पासवर्ड माहितीये?" कार्तिक आर्यनच्या प्रश्नावर बिग बींनी दिलं 'हे' खास उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:30 IST2025-12-18T12:27:09+5:302025-12-18T12:30:55+5:30
'कोण बनेल करोडपती'च्या मंचावर अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन सहभागी झाले होते. तेव्हा कार्तिकच्या प्रश्नावर बिग बींनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे

Video: "जयाजींना तुमच्या फोनचा पासवर्ड माहितीये?" कार्तिक आर्यनच्या प्रश्नावर बिग बींनी दिलं 'हे' खास उत्तर
'कोण बनेल करोडपती'च्या (KBC) मंचावर लवकरच एक मनोरंजक भाग पाहायला मिळणार आहे. आपल्या आगामी 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री अनन्या पांडे हॉट सीटवर बसलेले दिसणार आहेत. या भागाच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये कार्तिकने बिग बींना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही असे प्रश्न विचारले, ज्यावर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रश्न उत्तरांच्या मजेशीर राऊंडमध्ये कार्तिकने बिग बींना विचारले, "जयाजींना तुमच्या फोनचा पासवर्ड माहित आहे का?" हा प्रश्न ऐकताच अमिताभ बच्चन यांना हसू अनावर झाले आणि त्यांनी गमतीने उत्तर दिले, "मी त्यांना पासवर्ड सांगेल, वेडा आहेस का?" त्यांच्या या मजेशीर उत्तराने सेटवर एकच हशा पिकला. एवढ्यावरच न थांबता कार्तिकने दुसरा प्रश्न विचारला की, "तुम्ही जयाजींपासून लपून-छपून काही खाता का?" यावरही बिग बी खूप हसले.
या भागात केवळ गप्पाच नाही तर नव्या पिढीच्या भाषेची मजाही पाहायला मिळाली. अनन्या पांडेने अमिताभ बच्चन यांना 'OOTD', 'No Cap' आणि 'Drip' यांसारख्या शब्दांचा अर्थ समजावून सांगितला. जेव्हा तिने बिग बींना 'Drip' म्हटले, तेव्हा तो क्षण अधिकच गंमतीशीर झाला. ड्रीपचा अर्थ स्टायलिश आणि फॅशनेबल कपडे परिधान केलेला लूक असा असतो. हा अर्थ बिग बींना समजताच ते खूप हसले.
याशिवाय कार्तिक आर्यनने बिग बींना 'कोरियन दिल' कसं करायचे हे देखील शिकवले. कार्तिक आणि अनन्या यांचा 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्यासाठी ते सध्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. केबीसीच्या या विशेष भागामुळे प्रेक्षकांमध्ये आता चित्रपटाविषयी अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे.