कॅन्सर ट्रीटमेंटमुळे कोलमडून गेली दीपिका, अभिनेत्रीला अश्रू अनावर, म्हणाली- "दररोज नवीन काहीतरी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 11:16 IST2025-11-21T11:14:38+5:302025-11-21T11:16:27+5:30
दीपिकाने तिच्या युट्यूबवरुन नवीन व्लॉग शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कॅन्सर ट्रीटमेंटबाबत अपडेट देत आहे. पण, चाहत्यांसोबत हे शेअर करताना तिला मध्येच रडू कोसळलं आहे.

कॅन्सर ट्रीटमेंटमुळे कोलमडून गेली दीपिका, अभिनेत्रीला अश्रू अनावर, म्हणाली- "दररोज नवीन काहीतरी..."
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या कर्करोगाचा सामना करत आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिकाला लिव्हर ट्युमरचं निदान झालं होतं. तो ट्युमर कॅन्सरचा असल्याचं समजल्यानंतर दीपिका आणि शोएब इब्राहिमच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्यानंतर सर्जरी करून दीपिकाचा ट्युमर काढण्यात आला होता. आता तिची केमोथेरेपीची ट्रीटमेंट सुरू आहे. दीपिका चाहत्यांना याचे अपडेट्स तिच्या व्लॉगमधून देत असते.
दीपिकाने तिच्या युट्यूबवरुन नवीन व्लॉग शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कॅन्सर ट्रीटमेंटबाबत अपडेट देत आहे. पण, चाहत्यांसोबत हे शेअर करताना तिला मध्येच रडू कोसळलं आहे. दीपिका म्हणते, "प्रत्येक वेळी मी खूप टेन्शनमध्ये असते असं नाही. काही दिवस असेही असतात जेव्हा मला खूप आनंदी आणि सकारात्मक वाटतं. कधी कधी मला हेदेखील वाटतं की इतकी मोठी समस्या असूनही सगळं काही ठीक आहे. प्रत्येक दिवस काहीतरी वेगळी समस्या घेऊन येतो. पण, फक्त पुढे चालत राहणं आपल्या हातात आहे. मीदेखील हेच करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, मी आता भावनिकरित्या पूर्णपणे तुटले आहे. अल्लाहच्या कृपेमुळे माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. सगळं काही व्यवस्थित होत आहे. पण, मला अजूनही भीती वाटते. मी डॉक्टरांशीही याबद्दल बोलले".
"मला रोज काही ना काही नवीन समस्येचा सामना करावा लागत आहे. कधी माझी थायरॉइड लेव्हल कमी जास्त होते. हार्मोनल चेंजेसमुळे माझ्या शरीरावर परिणाम होतो आहे. माझी त्वचाही खूप ड्राय होते आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडीमुळेही माझी स्किन ड्राय झाली आहे. पण, काहीही झालं तरी मला स्ट्राँग राहून पुढे जात राहिलं पाहिजे. आपल्याकडे फक्त २ पर्याय असतात. भीतीपोटी काहीच न करणे किंवा मग त्याचा सामना करत पुढे चालत राहणे. या सगळ्याचा सामना करत पुढे चालत राहणं हेच आपल्या हातात आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी हार मानणार नाही", असंही दीपिका म्हणाली.