मला का जाब विचारता? सूरजलाच विचारा...; धनंजय पोवारचा संताप अनावर, नक्की विषय काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 14:12 IST2025-12-08T14:11:15+5:302025-12-08T14:12:36+5:30
सूरजला विचारायचा दम नाही का तुमच्यात? डीपी दादा भडकला

मला का जाब विचारता? सूरजलाच विचारा...; धनंजय पोवारचा संताप अनावर, नक्की विषय काय?
'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व लवकरच सुरु होणार आहे. दरम्यान पाचव्या पर्वातील सदस्यांमध्ये अजूनही ताणतणाव दिसत आहे. पाचव्या पर्वाचा विजोता सूरज चव्हाणचं नुकतंच लग्न झालं. त्याच्या लग्नात जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, योगिता चव्हाण यांनी हजेरी लावली. सूरजने लग्नानंतर त्याच्या नवीन घरात प्रवेशही केला. सूरजच्या नवीन घरासाठी मीच फर्निचर देणार असं आश्वासन धनंजय पोवारने दिलं होतं. मात्र आता नेटकरी कमेंट करत डीपी दादाला जाब विचारत आहेत. 'सूरजला फर्निचर का दिलं नाहीस?' असं विचारत आहेत. यावर धनंजय पोवारने व्हिडीओ शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
सूरज चव्हाणला फर्निचर न दिल्यावर अनेक जण धनंजय पोवारला जाब विचारत आहेत. त्यांच्यावर डीपी प्रचंड संतापला आहे. व्हिडीओ शेअर करत तो म्हणाला, "नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडीओ सूरजच्या घरातील फर्निचरचा आहे. सूरजच्या नवीन घरासाठी मी सोफा सेट देणार हे मी सूरजला आधीच सांगितलं होतं. सोसायटी फर्निचर देणार. हे मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं. दीड महिन्यापूर्वी त्याने मला फोन करुन विचारलं की 'दादा सोफा सेटचं कसं करायचं?'मी त्याला म्हणालो, 'मी सोफा सेट पाठवतोय. तुला कसा हवा आहे? तू इकडे बघायला येणारेस का? की माझ्या पद्धतीने पाठवू हे मी त्याला विचारलं. त्याला मी त्याचे हॉलचे फोटोही पाठव म्हटलं. त्यानुसार मी सोफासेट पाठवतो सांगितलं. तसंच मी त्याला घराचा पत्ताही विचारला की सोफा सेट तयार झाला की थेट पत्त्यावर पाठवून दिला असता."
तो पुढे म्हणाला, "सूरजने मला लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत हे सांगितलंच नाही ही त्याने फर्निचर बाहेरुन घेतलं आहे. मला काहीच कळवलं नाही. त्या माणसाने मला सांगायला हवं होतं. मी माझ्या हिशोबाने पुण्याच्या पार्टीला सांगून सोफा तयारही करुन घेतला होता. पण त्या माणसाने मला सांगितलं नाही. आज लोक कमेंट करत म्हणतायेत की मतांसाठी मी सूरजला फर्निचर देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला मतं मिळतात हे आम्हाला तिकडे घरात माहित नव्हतं. आज आम्ही जे काही आहोत ते आमच्याच हिंमतीवर आहोत. आमच्यात क्षमता आहे हे बघून आम्हाला मत मिळालं होतं. मी कधीही मत मिळण्यासाठी केलं नाही ते माझ्या रक्तात नाही. मी सूरजला हेही म्हटलं की,'अरे मी सोफा देणार होतो तुला'. तर तो मला म्हणाला,'नाही ना, हे दादाने पाठवलंय'. मी म्हणालो, 'अरे तू सांगायचं ना त्यांना की सोफा डीपी दादा देणारे'. तुम्ही सूरजला विचारा ना जाब, मला कशाला विचारताय? सूरजला विचारायचा दम नाही का तुमच्यात? मी आजही सोफा सेट द्यायला तयार आहे. मी त्याच्या भावाशीही बोललो होतो. सूरजला कमेंट करा तुम्हाला उत्तर तरी देतो का तो?"