एक्स पती राजीव सेनसोबत थायलंडला गेली चारु असोपा; म्हणाली, "गेल्या काही दिवसांपासून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 10:59 IST2025-09-10T10:59:22+5:302025-09-10T10:59:55+5:30
अभिनेत्रीने थायलंड ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. एक्स पतीसोबत आल्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाली चारु असोपा

एक्स पती राजीव सेनसोबत थायलंडला गेली चारु असोपा; म्हणाली, "गेल्या काही दिवसांपासून..."
अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि त्याची एक्स पत्नी टीव्ही अभिनेत्री चारु असोपा यांचा घटस्फोट झाला होता. तसंच काही महिन्यांपूर्वी चारुने मुंबई परवडत नाही म्हणून शहर सोडलं आणि ती मूळ गावी जाऊन स्थायिक झाली होती. तिथे तिने घरही बांधलं आणि साड्यांचा व्यवसाय सुरु केला. चारु आणि राजीव यांना एक गोंडस मुलगीही आहे. चारु लेकीला घेऊन गावी गेल्यानंतर राजीवने तिच्यावर काही आरोपही केले होते. मात्र आता अचानक गणेशोत्सवासाठी हे दोघंही पुन्हा सोबत आले. इतकंच नाही तर दोघंही लेकीसोबत थायलंड ट्रिपवरही गेले आहेत. चारुने तिच्या व्लॉगमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत.
चारु असोपा म्हणाली, "जेव्हा गावी मी माझं घर बनवत होते तेव्हापासून मी एकही दिवस विश्रांती घेतली नव्हती. मी खूप मेहनतीने काम केलं आहे. मला आता एका मोठ्या सुट्टीची गरज आहे. आम्ही बँकॉकला जायचं ठरवलं कारण मला मस्त मसाज करुन घ्यायचा आहे. स्वत:ला पॅम्पर करुन घ्यायचं आहे. मी गेल्या काही दिवसांपासून ज्या मेहनतीने काम केलं त्यानंतर मला प्रचंड अंगदुखी होतेय."
ती पुढे म्हणाली, "सुट्टीसाठी कुठे जायचं आणि किती दिवसांसाठी जायचं हे जेव्हा आम्ही ठरवत होतो तेव्हा माझ्या डोक्यात विश्रांती घेण्यासाठी केवळ एकच डेस्टिनेशन होतं. मी राजीवला हेही सांगितलं की हॉटेल बुक करताना मॉर्निंग ब्रेकफास्ट अजिबात घेऊ नको कारण मला सकाळी घाईघाईत उठायचं नाहीए. जेव्हा आपल्यावर मॉर्निंग ब्रेकफास्टचं प्रेशर असतं तेव्हा तुम्ही नीट झोपूही शकत नाही. मला मोठी सुट्टी हवीच होती."
चारुने इन्स्टाग्रामवर तिच्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये राजीवही आहे. दोघंही पुन्हा एकत्र दिसत असल्याने चाहतेही खूश झालेत. चारु आणि राजीव एकत्र पुन्हा संसार सुरु करणार का असं चाहते विचारत आहेत.