पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 09:09 IST2025-08-30T09:07:45+5:302025-08-30T09:09:04+5:30
देवाच्या दारात कलाकारांचा पार्टी डान्स, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
सध्या सगळीकडे गणपतीचं आगमन झाल्याने वातावरण मंगलमय झालं आहे. दरवर्षी अनेक मराठी, बॉलिवूड सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. यावर्षीही अनेक कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीच्या घरीही दरवर्षी बाप्पाचं आगमन होतं. अर्जुन दरवर्षी स्वत:च्या हाताने गणेशमूर्ती घडवतो. यंदाही अर्जुनने गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती घडवत बाप्पाची स्थापना केली आहे. पण, गणेशोत्सवादरम्यानच्या एका व्हिडिओने मात्र नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
दरवर्षी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेक कलाकार अर्जुनच्या घरी येत असतात. यंदाही काही कलाकार गणेशोत्सवासाठी अर्जुनच्या घरी आले होते. पण, बाप्पाची पूजा आणि भक्ती करताना कलाकारांचा धांगडधिंगा पाहून नेटकरी संतापले आहेत. अर्जुन बिजलानीच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत टीव्हीवर घालीन लोटांगण हे आरतीचं गाणं सुरू असल्याचं दिसत आहे. आणि घालीन लोटांगणवर कलाकार डान्स करत आहेत. यामध्ये अर्जुन बिजलानी, त्याची पत्नी, निया शर्मा आणि आणखीही काही कलाकार आहेत. अर्जुन बिजलानीच्या घरातील हा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले आहेत.
एकाने कमेंट करत "पूजा कमी आणि नौटंकी जास्त वाटतेय", असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "या गाण्यावर असा डान्स करत नाहीत", असं म्हटलं आहे. "देवाच्या नावावर पार्टी आणि डान्स..हे बरोबर आहे का? देवाचा आदर करा", "देवाची पूजा अशी करत नाहीत" अशा कमेंट्सही काहींनी केल्या आहेत. तर काहींनी मराठी कलाकारांसोबत तुलनाही केली आहे. "आमच्या मराठी कलाकारांकडून शिका. देवांचा आदर कसा करायचा ते...नुसती हाताने मूर्ती बनवून काही होत नाही. ही पूजा कमी पार्टी जास्त वाटत आहे", असं म्हटलं आहे.