’चारवेळा जिंकलेले आमदार गॉगल लावून प्रचाराला गेले आणि लोक त्यांना बघून पळू लागले’, केशव उपाध्येंनी सांगितलेला किस्सा होतोय तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 18:35 IST2022-01-12T17:52:53+5:302022-01-12T18:35:26+5:30
Keshav Upadhye: राजकारणात सक्रिय असलेल्या मंडळींकडे किस्से कहाण्यांचा भरपूर खजिना असतो. यातील काही किस्से हे धमाल विनोदी असतात. असाच एक जबरदस्त किस्सा भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी झी मराठी या वाहिनीवर सुरू असलेल्या हे तर काहीच नाय या कार्यक्रमात सांगितला आहे.

’चारवेळा जिंकलेले आमदार गॉगल लावून प्रचाराला गेले आणि लोक त्यांना बघून पळू लागले’, केशव उपाध्येंनी सांगितलेला किस्सा होतोय तुफान व्हायरल
मुंबई - राजकारणात सक्रिय असलेल्या मंडळींकडे किस्से कहाण्यांचा भरपूर खजिना असतो. यातील काही किस्से हे धमाल विनोदी असतात. असाच एक जबरदस्त किस्सा भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी झी मराठी या वाहिनीवर सुरू असलेल्या हे तर काहीच नाय या कार्यक्रमात सांगितला आहे. हा किस्सा आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या कार्यक्रमात हा किस्सा सांगताना केशव उपाध्ये म्हणाले की, असेच एक बलदंड नेते होते, ते पराभूत कसे झाले त्याचा हा किस्सा आहे. हे बलदंड नेते चारवेळा निवडून आले होते. तसेच पाचव्यांदा ते निवडणुकीला उभे होते. समोर विरोधी उमेदवार फारसा मोठा नव्हता. त्यामुळे ते पाचव्यांदा निवडून येण्याबाबत निश्चिंत होते. पण नेमका फॉर्म भरण्याची वेळ आली आणि या नेत्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली.
या शस्त्रक्रियेनंतर काळा चष्मा घालावा लागतो. एका कार्यकर्त्याने आमदारांना सांगितले की, साहेब तुम्ही आमदार आहात, निवडणुकीला उभे आहात, असला कसला चष्मा वापरता? असा चष्मा वापरा. ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी स्टीलच्या फ्रेमचा तो वेगळा चष्मा लावायला सुरुवात केली. ते मतदारसंघात गेले. निवडणुकीला जेमतेम १५ दिवस उरले होते. ते प्रचाराला जायला लागले, मात्र ते ज्या गल्लीत प्रचाराला जाऊ लागले तिथल्या गल्ल्या ओस पडायला लागल्या. त्याचं झालं असं की, त्यांचे जे विरोधक होता त्याने अशी अफवा पसरवली की, साहेब ऑपरेशन करून आले आहेत आणि त्यांनी अमेरिकेतून असा एक गॉगल मागवलाय, की त्यातून आरपार दिसतं. त्यामुळे हे साहेब ज्या गल्ली जायचे त्या गल्या ओसाड पडायच्या. दरवाजे बंद व्हायचे. कालपर्यंत जे कार्यकर्ते बोलवायचे त्यांनी बोलावणे बंद केले. सुरुवातीला काय चाललंय हे त्यांना कळेनाच. काय चाललंय हे त्यांना बारा तेरा दिवसांनंतर कळलं की अशी अफवा पसरली आहे. पुढचे चार दिवस हा तसा चष्मा नाही, असं सांगण्यात गेले. अखेर ज्यानं ही अफवा पसरवली होती तो कार्यकर्ता अखेर निवडून आला.
झी मराठीवरील हे तर काहीच नाय, या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी सहभागी होऊन आपले अनुभव कथन करत असतात. दरम्यान, यावेळच्या भागामध्ये भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रसारण येत्या शुक्रवारी रात्री ९.३० वाजता होणार आहेत.