"इंडस्ट्रीत अनोळखी असल्यासारखी वागणूक मिळाली...", अभिजीत सावंत असं का म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 11:50 IST2025-05-14T11:34:45+5:302025-05-14T11:50:28+5:30
"मराठी नसल्यासारखंच मला वागवलं गेलं...", अभिजीत सावंतने व्यक्त केली मनातील खदखद, म्हणाला-"लोकांचा असा विचार ..."

"इंडस्ट्रीत अनोळखी असल्यासारखी वागणूक मिळाली...", अभिजीत सावंत असं का म्हणाला?
Abhijeet Sawant: आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा गायक म्हणजे अभिजीत सावंत (Abhijeet Sawant). फक्त संगीताची जादूच नाहीतर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातही सहभागी होऊन त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या पर्वाचा तो उपविजेता ठरला. नुकतंच अभिजीत सावंतचं चाल तुरु तुरु हे गाणं नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर घेऊन आला आहे. यानिमित्ताने त्याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. अभिजीत सावंतच्या त्या वक्तव्याने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नुकताच अभिजीत सावंतने 'एबीपी माझा' सोबत संवाद साधला. त्यादरम्यान, अभिजीतने त्याच्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यावेळी तो म्हणाला, "खरंतर मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं. एक अनोखळी व्यक्ती असल्यासारखी वागणूक मला मराठीमध्ये मिळाली. मी मराठी नसल्यासारखंच मला वागवलं गेलं. तो अनुभव माझ्यासाठी वाईट होता. त्यामुळे मी खूप दुखावलो गेलो. ज्यापद्धतीने मराठी प्रेक्षकांनी मला खूप प्रेम दिलं की हा आमचा मराठी मुलगा आहे, असं म्हणत त्यांनी मला स्वीकारलं. पण, मराठी इंडस्ट्रीकडून मला हे कधीच जाणवलं नाही. कधीच मला तसं वागवण्यात आलं नाही. 'बिग बॉस मराठी'मुळे मला मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा भेटण्याची संधी मिळाली. हा प्रयत्न माझा यशस्वी ठरला. आजही मला मराठी इंडस्ट्रीमधील लोक विचारतात की, अरे! तू मराठी खूप चांगला बोलतो."
त्यानंतर पुढे अभिजीतला एक प्रश्न विचारण्यात आला, या सगळ्यामागे तुझं मार्केटिंग कमी पडलं का? त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, "तसं मराठी इंडस्ट्री एवढी मोठीही नाही. पण माझा हिंदी चित्रपटसृष्टीकडे कल अधिक राहिला. कारण ‘इंडियन आयडल’ एक हिंदी प्लॅटफॉर्म होता. मी जास्त गाणीही हिंदीमध्येच शिकलो. माझे गुरुजीही नॉर्थ इंडियन होते. पण मी मराठी माध्यममधील मुलगा आहे. दादरच्या राजा शिवाजी शाळेतील मी विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढील शिक्षण ही मराठीतच करणार असा विचार माझा होता. त्याचबरोबर माझा पहिला चित्रपटही हिंदी होता. पण, त्यामध्ये मी मराठी कलाकारांबरोबर काम केलं आहे. पण माझ्याबद्दल लोकांचा एक असा विचार आहे की, हा हिंदी करणारा मराठी मुलगा आहे."असं म्हणत अभिजीत सावंतने मनातील खंत व्यक्त केली.