'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने ३६ व्या वर्षी केलं दुसरं लग्न, 'रामायणा'तील लक्ष्मणाची झाली सून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:00 IST2025-10-08T15:58:21+5:302025-10-08T16:00:59+5:30
अभिनेत्रीने ३६ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. बॉयफ्रेंडसोबत कोर्ट मॅरेज करुन अभिनेत्रीने सर्वांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे

'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने ३६ व्या वर्षी केलं दुसरं लग्न, 'रामायणा'तील लक्ष्मणाची झाली सून
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आणि 'बिग बॉस ४' (Bigg Boss 4) ची स्पर्धक सारा खान (Sara Khan) हिने लग्नगाठ बांधली आहे. साराने रामायण (Ramayana) मालिकेतील 'लक्ष्मण' ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी (Sunil Lahri) यांचा मुलगा आणि अभिनेता-निर्माता क्रिश पाठकसोबत (Krish Pathak) विवाह केला आहे.
६ ऑक्टोबर २०२५ रोजी सारा खान आणि क्रिश पाठक यांनी कोर्ट मॅरेज केलं. सारा खानचे हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी तिने 'बिग बॉस'च्या घरात असताना अली मर्चंट याच्याशी लग्न केलं होतं, पण ते नातं फक्त दोन महिनेच टिकलं होतं. सारा खानने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. कोर्ट मॅरेजनंतर डिसेंबर महिन्यात मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा होणार असल्याचेही तिनं सांगितलं आहे. सारा खानचा पती क्रिश पाठक हा अनेक टीव्ही शोमध्ये दिसला आहे.
एका मुलाखतीत साराने तिच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "मी जेव्हापासून क्रिशसोबत राहायला लागले, तेव्हापासून मला त्याची पत्नी असल्यासारखं वाटत होतं. पण कोर्ट मॅरेजचा अनुभव काहीतरी वेगळाच होता, मला खूप छान वाटलं. क्रिश हाच तो व्यक्ती आहे, ज्याला मी माझा जीवनसाथी म्हणून नेहमी पाहिलं होतं. मला वाटतं संयम ठेवल्यास योग्य व्यक्ती आयुष्यात नक्कीच मिळते. आमचं नातं या जन्मापलीकडचे आहे." क्रिशशी लग्न केल्याचा निर्णय हा तिचा 'सर्वोत्तम निर्णय' असल्याचं सांगितलं.
कशी झाली लव्ह स्टोरीची सुरुवात?
सारा आणि क्रिश यांची प्रेम कहाणी एका डेटिंग ॲपवरून सुरू झाली. साराने सांगितलं की, क्रिशचा फोटो पाहताच त्याच्याशी मैत्री करण्याची तिची इच्छा झाली. दोघांनी बोलणं सुरू केलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची भेट झाली. भेटीच्या वेळीच साराने क्रिशला सांगितले होतं की तिला आता संसार थाटायचा आहे. त्यामुळे डेटिंग केल्यानंतर काही महिन्यांनी आता क्रिश आणि साराने कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे.