नुकतीच आई झालेली भारती सिंग घेणार ब्रेक, आता 'हा' अभिनेता करणार 'लाफ्टर शेफ्स'चं सूत्रसंचालन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 12:14 IST2025-12-22T12:13:25+5:302025-12-22T12:14:57+5:30
नुकतीच आई झालेली भारती सिंग मॅटर्निटी लीव्हवर गेली असून तिच्या जागी आता 'हा' प्रसिद्ध अभिनेता करणार लाफ्टर शेफ्सचं सूत्रसंचालन करणार आहे

नुकतीच आई झालेली भारती सिंग घेणार ब्रेक, आता 'हा' अभिनेता करणार 'लाफ्टर शेफ्स'चं सूत्रसंचालन
टीव्हीवरील लोकप्रिय शो 'लाफ्टर शेफ्स'च्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या शोचे मुख्य आकर्षण असलेली प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग हिने नुकतेच दुसऱ्या मुलाला जन्म दिला असून ती आता काही काळ 'मॅटरनिटी लीव्ह'वर जाणार आहे. त्यामुळे तिच्या अनुपस्थितीत या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता अर्जुन बिजलानी सांभाळताना दिसणार आहे.
भारतीची रजा आणि नवीन सूत्रसंचालक
भारती सिंगने १९ डिसेंबर रोजी मुलाला जन्म दिला. प्रकृतीच्या कारणास्तव आणि बाळाचा सांभाळ करण्यासाठी तिला काही काळ कामातून ब्रेक घेणे आवश्यक आहे. 'लाफ्टर शेफ्स' हा शो सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे, त्यामुळे तो मध्येच थांबवणे शक्य नाही. निर्मात्यांनी विचारविनिमय करून अर्जुन बिजलानीची निवड केली आहे. अर्जुन या शोमध्ये आधीपासूनच एक स्पर्धक म्हणून सहभागी आहे. त्याचं इतर सदस्यांशी असलेलं नातं पाहता तो सूत्रसंचालनाची जबाबदारी उत्तमरित्या पेलू शकेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
अर्जुन बिजलानीची प्रतिक्रिया
सूत्रसंचालनाची जबाबदारी मिळाल्यानंतर अर्जुनने आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला, "भारतीची जागा घेणे कोणालाही शक्य नाही, कारण तिची विनोदबुद्धी आणि एनर्जी अफाट आहे. मात्र, ती परत येईपर्यंत मी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. मी तिला खूप मिस करेन, पण शोची धुरा सांभाळण्यासाठी मी सज्ज आहे."
लाफ्टर शेफ्स'मध्ये अर्जुन बिजलानी आणि करण कुंद्रा यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. आता अर्जुन एका स्पर्धकाच्या भूमिकेतून थेट होस्टच्या भूमिकेत आल्यामुळे शोमध्ये काय नवीन गमतीजमती पाहायला मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारती सिंग लवकरच पुन्हा कामावर परतेल, अशी आशाही चाहत्यांनी व्यक्त केली आहे. भारती सिंगला दुसराही मुलगाच झाल्याने ती आणि तिचं कुटुंब आनंदात आहे. भारतीला मात्र आता मुलीची अपेक्षा आहे.