गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:06 IST2025-12-19T12:06:13+5:302025-12-19T12:06:48+5:30
पहिल्या मुलानंतर भारतीने मुलगी हवी अशी इच्छा व्यक्त केली होती.

गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा आई झाली आहे. आज १९ डिसेंबर रोजी तिने गोंडस मुलाला जन्म दिला. आज सकाळीच 'लाफ्टर शेफ'च्या शूटआधी तिला प्रसुतीकळा सुरु झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला दुसऱ्यांदा मुलगा झाला. ३ एप्रिल २०२२ रोजी भारतीला पहिला मुलगा झाला होता. त्याचं नाव लक्ष्य असं आहे. त्याला प्रेमाने त्यांनी गोला असं नाव ठेवलं. आता छोट्या गोला ला त्याच्याहून चिमुकला भाऊ मिळाला आहे.
टेली टॉक मीडियानुसार, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया आईबाबा झाले आहेत. गोला नंतर त्यांना पुन्हा पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. भारतीने गुडन्यूज दिल्यानंतर चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. भारतीच्या दुसऱ्या मुलाचीही झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. खरंतर भारतीने यावेळी मुलगी हवी अशी इच्छा व्यक्त केली होती. 'मुलानंतर एक मुलगी तर असावीच. घरात शिस्त राहते. गोला तर खूप उत्साहित आहे. गोला नंतर आता गोली हवी' अशी तिने प्रतिक्रिया दिली होती. मुलीची इच्छा पूर्ण होऊ शकली नसली तरी दुसऱ्या बाळाच्या जन्माचा आनंद मोठा आहे. भारतीने वयाच्या ४१ व्या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे.
गेल्या आठवड्यातच भारतीचं डोहाळजेवण झालं होतं. यासाठी अनेक टीव्ही कलाकार आले होते. अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, ऋतिक धनजानी, एल्विश यादवसह अनेक कलाकारांची हजेरी होती. भारतीला प्रेग्नंसीच्या शेवटच्या काळात श्वास घेण्यासही अडचण येत होती. तसंच तिचं बीपी शूट होत होतं असंही ती म्हणाली होती. आज मुलाच्या जन्माने भारती आणि हर्ष दोघंही आनंदात आहेत.
भारती सिंह आणि हर्षने अद्याप अधिकृतरित्या गुडन्यूज जाहीर केलेली नाही. मात्र सोशल मीडियावर भारतीच्या दुसऱ्या डिलीव्हरीचीच चर्चा आहे. चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. दरम्यान भारती अगदी डिलीव्हरीच्या दिवसापर्यंत शूटिंग करत होती. आज डिलीव्हरी झाल्याने 'लाफ्टर शेफ'चं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.