घराबाहेर येताच बसीर अलीचे 'बिग बॉस १९'चे मेकर्स आणि सलमानवर आरोप, म्हणाला- "माझ्यावर अन्याय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:59 IST2025-10-28T13:58:16+5:302025-10-28T13:59:29+5:30
बसीर अलीने शोच्या मेकर्सने आणि सलमानने माझ्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप केला आहे. काय म्हणाला?

घराबाहेर येताच बसीर अलीचे 'बिग बॉस १९'चे मेकर्स आणि सलमानवर आरोप, म्हणाला- "माझ्यावर अन्याय..."
'बिग बॉस १९' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून नुकताच बाहेर पडलेला स्पर्धक बसीर अलीने (Baseer Ali) शोचा होस्ट सलमान खान (Salman Khan) आणि शोच्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. 'माझं जे एविक्शन झालं ते अन्यायकारक आहे आणि शोमध्ये पक्षपातपणा करण्यात आलाय', असा आरोप बसीरने केला आहे.
बसीर अली हा ग्रँड फिनालेसाठी दमदार स्पर्धक मानला जात होता. त्यामुळे त्याचं शोमधून बाहेर पडणं प्रेक्षकांसाठी आणि घरातील इतर स्पर्धकांसाठी एक मोठा धक्का होता. त्याने एका मुलाखतीत सांगितलं की, "मी इतर रिअॅलिटी शोमध्ये काम केल्यामुळे निर्णय मान्य करण्याची कला मी शिकलोय. जेव्हा मी बाहेर पडलो, तेव्हा एका सेकंदासाठी माझा विश्वास बसत नव्हता. ज्या दिवशी माझं एविक्शन झालं, त्या दिवशी ते घर वेगळं वाटत होतं. मी ही गोष्ट देवाचा संकेत म्हणून स्वीकारली आणि चेहऱ्यावर हसू ठेवून बाहेर पडलो."
बिग बॉसची सह-स्पर्धक मालती चहरने बसीरच्या लैंगिकतेवर टिप्पणी केली होती. ही गोष्ट टीव्हीवर दाखवण्यात आली नाही. त्यामुळे शोच्या मेकर्सने आणि सलमान खानने या गोष्टीला दुर्लक्ष केल्याबद्दल त्याने प्रश्न उपस्थित केले. "बिग बॉस त्यावेळी काय करत होते? ही गोष्ट कॅमेऱ्यासमोर बोलली गेली आणि त्याची क्लिप बिग बॉस टीमनेच बाहेर काढली होती. सलमान खान सरांनी किंवा निर्मात्यांनी याबद्दल काय केलं? त्यांना याबद्दल बोलण्याची इच्छा नव्हती का? माझ्यासाठी हे योग्य होतं का?" असा सवाल त्याने केला.
त्याने पुढे सांगितलं की, जेव्हा त्याने बिग बॉसमधील स्पर्धकांच्या दर्जाला 'कचरा' म्हटलं, तेव्हा तो एक मोठा मुद्दा बनवण्यात आला आणि त्याला खलनायक ठरवण्यात आलं. पण, इतरांनी त्याच्यावर ज्या आक्षेपार्ह टिप्पणी केल्या त्याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलंं. बसीरने शोच्या प्रोडक्शन टीमवर मार्गदर्शन न दिल्याबद्दल देखील टीका केली. "मला कोणतंही योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. माझ्याबद्दल जे काही नकारात्मक बोललं गेले, ते सर्व वगळणं अन्यायकारक आहे," असं मत त्याने शेवटी व्यक्त केले.