असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 10:54 IST2025-08-11T10:54:03+5:302025-08-11T10:54:48+5:30
दिशा वकानीच्या घरी पोहोचले असित मोदी, अभिनेत्रीच्या दोन्ही लेकींचीही दिसली झलक

असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय विनोदी मालिकेत दयाबेन च्या भूमिकेतून सर्वांचं मन जिंकणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) अनेक दिवसांनी समोर कॅमेऱ्यासमोर आली आहे. निमित्त आहे रक्षाबंधनाचं. मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) हे दिशाच्या घरी पोहोचले आणि त्यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी ते दिशाच्या पायाही पडले आणि आशीर्वाद घेतला. दिशाच्या दोन्ही मुलीही फोटोत दिसत आहेत. त्यांच्या रक्षाबंधनाचा फोटो पाहून चाहत्यांना दयाबेनची आठवण झाली आहे.
रक्षाबंधनाच्या सणाला असित मोदी पत्नी नीलासह दिशा वकानीच्या घरी पोहोचले. दिशा आणि तिच्या कुटुंबासोबत त्यांनी रक्षाबंधन साजरा केला. यावेळी दिशाच्या दोन्ही छोट्या मुलीही दिसल्या. अगदी खाजगी समारोहात त्यांनी सण साजरा केला. सर्वांच्या चेहऱ्यावर एकमेकांना भेटल्याचा आनंद दिसत होता. दिशा आणि असित मोदी यांच्या ऑफस्क्रीनही रक्तापलीकडचं घट्ट नातं आहे हे यावरुन दिसून आलं. यासोबत दिशा मालिकेत कमबॅक करणार का या चर्चेला पुन्हा जोर आला आहे. असित मोदींनी या भेटीत दिशा वकानीला परत मालिकेत येण्यास विचारलं आहे का अशीही चर्चा सुरु आहे.
"असित मोदींनी रक्षाबंधनाचे हे क्षण पोस्ट करत लिहिले, "काही नाती नशिबानेच तयार होतात. रक्ताचं नाही पण मनाचं नातं तयार होतं. दिशा आमची फक्त दया भाभी नाही माझी बहीणही आहे. अनेक वर्षांचा आनंद, आठवणी आणि आपलेपणा जपत हे नातं स्क्रीनच्या पलीकडे गेलं आहे. या रक्षाबंधनाला तोच अतूट विश्वास आणि खोल आपलेपणा पुन्हा जाणवत आहे. हे नातं नेहमीच इतक्याच गोड आणि मजबूतीने बांधलं राहावं हीच इच्छा."
दिशा वकानीने २०१७ मध्ये मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिने मालिका सोडली. २०२२ मध्ये तिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. सध्या ती घर संसारातच व्यस्त आहे. ती मालिकेत पुन्हा परतलीच नाही. इतक्या वर्षांनी आजही चाहते तिला विसरलेले नाहीत. तसंच असित मोदींनीही मालिकेत दुसरी दयाबेन घेतली नाही.