बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 08:21 IST2025-12-15T08:19:49+5:302025-12-15T08:21:31+5:30
अभिनेत्याच्या पाळीव श्वानालाही मारलं, स्वत:च व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...

बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
मुंबईतील गोरेगाव येथील सोसायटीत राहणारा टीव्ही अभिनेता अनुज सचदेवावर हल्ला झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अनुजने स्वत:च सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संपूर्ण घटना दाखवली आहे. सोसायटीतील एका माणसाने त्याला शिव्या दिल्या आणि मारहाण केली. इतकंच नाही तर अनुजच्या पाळीव श्वानालाही सोडलं नाही. अनुजने व्हिडीओ शेअर करताच इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनाही धक्का बसला आहे.
अनुजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक माणूस त्याला मारहाण करताना दिसतोय. हातात काठी घेऊनही मारत आहे. तसंच शिव्याही देत आहे. मी तुझा जीव घेईन असंही तो म्हणत आहे. दोन सुरक्षारक्षकांनी त्या माणसाला फक्त धरुन ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अगदीच रागात असल्याचं दिसून येत आहे. अनुज नंतर म्हणतो, "या माणसाने मला मारहाण केली आहे. माझ्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. एक तासापासून हा मला मारत आहे."
यासोबत अनुजने कॅप्शनमध्ये लिहिले, "हा माणूस मला किंवा माझ्या प्रॉपर्टीला कोणतीही इजा करेल त्याआधीच हा व्हिडीओ मी पुरावा म्हणून पोस्ट करत आहे. सोसायटीमध्ये चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्यानेया माणसाने माझ्या पाळीव श्वानाला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. हार्मनी मॉल रेसिडन्सी, गोरेगाव पश्चिम येथे ए विंगमध्ये या माणसाचा ६०२ फ्लॅट नंबर आहे. कृपया हा व्हिडीओ शेअर करा जेणेकरुन त्याच्यावर कारवाई होईल. माझ्या डोक्यातून रक्त येत आहे."
अनुजच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी काळजी व्यक्त केली आहे. तसंच त्याच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्या माणसाविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. अनुजची तब्येत आता कशी आहे याबद्दल अद्याप अपडेट आलेले नाही. त्यामुळे त्याचे चाहतेही चिंतेत आहेत.
अनुज सचदेवा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. एमटीव्ही रोडीज शो मध्ये तो सहभागी झाला होता. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं. 'ये रिश्ता क्या कहलाता है','बिदाई','साथ निभाना साथिया','प्रतिज्ञा' यांसारथ्या मालिकांमध्ये तो दिसला. 'छल कपट' वेबसीरिजमध्येही त्याने भूमिका साकारली.