कुंभसाठीच्या वृक्ष तोडीविरोधातील आंदोलनात अनिता दाते सहभागी, १८०० झाडं तोडण्यावरून संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:41 IST2025-12-04T15:40:20+5:302025-12-04T15:41:15+5:30
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात झालेल्या आंदोलनात अभिनेत्री अनिता दाते केळकरनं प्रत्यक्ष मैदानात उतरून आपला ठाम पाठिंबा दर्शवला.

कुंभसाठीच्या वृक्ष तोडीविरोधातील आंदोलनात अनिता दाते सहभागी, १८०० झाडं तोडण्यावरून संताप
Anita Date on Tapovan Tree Cutting : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनापूर्वी वाद निर्माण झालेत. साधुग्राम या साधुसंतांसाठीच्या तात्पुरत्या शहरासाठी तपोवनमधली १८०० झाडं तोडण्याचा प्रस्ताव नाशिक महानगर पालिकेने पुढे केला आहे. तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड आणि त्यास होणारा विरोध हा विषय सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे. वृक्षतोडीविरोधात नाशिकमधूनच नव्हे तर, महाराष्ट्राच्या अनेक भागातूनही विरोध होत आहे. तपोवन परिसरात असलेही ही वनराई अबाधित राखण्यासाठी विविध संघटना, विद्यार्थी, अभिनेते, कलाकार शिक्षणसंस्था, योगसंस्था, संगीतसंस्था एकवटले आहेत. तपोवनातील वृक्षतोडीविरोधात झालेल्या आंदोलनात अभिनेत्री अनिता दाते केळकरनं प्रत्यक्ष मैदानात उतरून आपला ठाम पाठिंबा दर्शवला.
नाशिकची मूळ रहिवासी असलेल्या अनिता दाते केळकरनं तपोवन परिसरातील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वृक्षतोडीचा तीव्र निषेध केला. "आमच्या शहराचं विद्रुपीकरण करण्याचा जो कट रचला जातोय, त्याचा मी निषेध व्यक्त करते", असे म्हणत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
पैसा आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची होत असलेली हानी किती धोकादायक आहे, हे अनितानं स्पष्ट केले. अंदोलनकर्ते रोहन देशपांडे यांच्याशी बोलताना ती म्हणाली, "या सगळ्याच गोष्टींशी आमचं, नाशिकरांचं नातं जोडलं गेलंय. आपली नदी, आपलं पर्यावरण आपण वाचवलं नाही तर आपला अंत जवळ आहे. कारण अशाप्रकारचा विकास तुम्हाला काय देणार आहे.जगण्यासाठी पैसा लागतो मला मान्य आहे, विकास लागतो तोही मान्य आहे. एक आरोग्य नावाची गोष्ट आहे, ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कसं जगणार आहात. ही झाडं कापून तुम्हाला काहीही मिळणार नाहीये".
पुढे ती म्हणाली, "मला वाटतं इथलं पानसुद्धा इथेच राहावं. इथली झुडपदेखील म्हत्त्वाची आहेत. या सगळ्यांमध्ये जीव आहे. इथल्या कुठल्याही गोष्टीला कुणीही हात लावू नये. हे पर्यायवरण आपण जिवंत ठेवलं पाहिजे. त्याच्याशिवाय नाशिक वाचूच शकत नाही. कलाकार म्हणून मला हा विकास अमान्य आहे. प्रत्येक शहरात नाट्यगृह, चित्रपटगृह असावं, पण ते झाड तोडून नसावं. जर उद्या नाट्यगृह नसतील तर आम्ही रस्त्यावर नाटक करु, झाडाखाली नाटक करु. पण, अशाप्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास करुन केलेली कुठलीही गोष्ट अमान्य आहे". यावेळी अनिता दातेनं सरकारला वृक्षतोडीच्या निर्णयाचा पुर्नविचार करण्याची विनंती केली. एकीकडे 'हरितकुंभ' म्हणायचं आणि दुसरीकडे वृक्षतोड करायची, हा मोठा विरोधाभास असल्याचंही तिनं ठामपणे नमूद केलं.