'केबीसी १७'चं चालू शूटिंग अमिताभ बच्चन यांनी अचानक थांबवलं; घेतला 'हा' मोठा निर्णय, चाहते थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:49 IST2025-12-17T13:46:25+5:302025-12-17T13:49:21+5:30
बिग बींनी अचानक 'केबीसी १७'चं शूटिंग का थांबवलं? कारण वाचून तुमच्याही भुवया उंचावतील

'केबीसी १७'चं चालू शूटिंग अमिताभ बच्चन यांनी अचानक थांबवलं; घेतला 'हा' मोठा निर्णय, चाहते थक्क
सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट करत असलेल्या 'कौन बनेगा करोडपती १७'ची (kbc 17) चांगलीच चर्चा आहे. वयाची ८० वर्ष ओलांडली तरीही अमिताभ बच्चन त्यांच्या खास शैलीत 'केबीसी १७'चं सूत्रसंचालन करत आहेत. पण नुकतंच 'केबीसी १७'च्या सेटवर एक किस्सा घडला. ज्यामुळे बिग बींना चालू शूटिंग मध्येच थांबवावं लागलं. काय घडलं नेमकं? जाणून घ्या
अमिताभ यांनी 'केबीसी १७'चं शूटिंग का थांबवलं?
'केबीसी १७'च्या सेटवर घडलेल्या या घटनेची माहिती अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या ब्लॉगमध्ये लिहिली आहे. १६ डिसेंबरच्या ब्लॉगमध्ये त्यांनी हा किस्सा सांगितला. 'केबीसी १७'च्या एका एपिसोडमध्ये एक महिला स्पर्धक सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्या पतीची तब्येत अचानक बिघडली. काही वेळाने तिचे पती ठीक झाले. पण नवऱ्याची तब्येत ठीक नसताना पत्नीला 'केबीसी'चा खेळ खेळताना त्रास होईल, तिचं लक्ष लागणार नाही, याची अमिताभ यांना जाणीव झाली.
'केबीसी १७' हा रोज टीव्हीवर प्रसारीत होणारा शो आहे. त्यामुळे शूटिंग बंद झाल्यास चॅनलच्या प्रसारणावर परिणाम होईल, याचीही बिग बींना कल्पना होती. परंतु तरीही त्यांनी स्पर्धकाच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्येला प्राधान्यक्रम दिला. ''मला दुसऱ्या दिवशी तीन एपिसोडचं शूटिंग करावं लागलं तरी चालेल. परंतु स्पर्धकाच्या पतीला बरं होण्यासाठी वेळ द्यावा.'', असं अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या टीमला सांगितलं.
बिग बींच्या निर्णयाचं सर्वांनी कौतुक केलं. व्यावसायिकरित्या काम करताना बिग बींनी दाखवलेली ही संवेदनशीलता नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. 'केबीसी १७'चं शूटिंग मध्यरात्री सुरु होऊन ते पहाटेपर्यंत चालतं. त्यामुळे बिग बींनी घेतलेला हा निर्णय महिला स्पर्धक आणि तिच्या पतीसाठी गरजेचा होता. अमिताभ यांचा किस्सा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.