अक्षय कुमारचं टीव्हीवर कमबॅक! घेऊन येतोय नवीन शो, 'व्हील ऑफ फॉर्च्युन'चा टीझर समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:27 IST2025-12-22T13:25:34+5:302025-12-22T13:27:07+5:30
खिलाडी कुमार पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमार नवा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'व्हील ऑफ फॉर्च्युन' असं या शोचं नाव असून याचा प्रोमोही समोर आला आहे.

अक्षय कुमारचं टीव्हीवर कमबॅक! घेऊन येतोय नवीन शो, 'व्हील ऑफ फॉर्च्युन'चा टीझर समोर
बॉलिवूडचा खिलाडी कुमार पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमार नवा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'व्हील ऑफ फॉर्च्युन' असं या शोचं नाव असून याचा प्रोमोही समोर आला आहे. या शोमध्ये सर्वसामान्यांना त्यांचं नशीब पालटण्याची संधी मिळणार आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ६० देशांमध्ये हा टीव्ही शो लोकप्रिय आहे. लवकरच आता भारतातील टेलिव्हिजनवरही हा शो सुरू होत आहे.
'व्हील ऑफ फॉर्च्युन'चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये दिसतंय की वकील मृत्यूपत्राचं वाचन करत आहेत. त्यांचं कुटुंबीय समोर बसले आहेत. तर अक्षय कुमार नोकराच्या भूमिकेत आहे. पण, आपली कोट्यवधींची संपत्ती मुलगा रामच्या नावावर न करता नोकर रामूच्या नावावर केल्याचं दिसत आहे. पुढे असं दाखवण्यात आलंय की रामू बनलेला अक्षय कुमार मोठ्या शिताफिने रामवर रामू असं त्याच्या मालकाकडून लिहून घेतो.
प्रोमोमध्ये अक्षय कुमार म्हणतो की "एक ऊकाराने सगळं काही बदललं. शब्दांची कारीगरी जादू करू शकते. आता एक एक अक्षर महत्त्वाचं ठरणार, जेव्हा हा जादूचा चक्कर घुमणार". लवकरच सोनी टीव्हीवर 'व्हील ऑफ फॉर्च्युन' हा नवा रिएलिटी शो सुरू होणार आहे. या शोचं सूत्रसंचालन अक्षय कुमार करणार आहे. अमेरिकेतील हा सगळ्यात गाजलेला टीव्ही शो आहे. या शोला तब्बल ८ एमी अवॉर्ड्स मिळाले आहेत.