पैशांची बचत करण्यासाठी ऐश्वर्या नारकरांनी सांगितला सोपा अन् महत्वाचा उपाय; म्हणाल्या- "घर घ्यायच्या वेळेस आम्ही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 13:11 IST2025-01-11T13:11:25+5:302025-01-11T13:11:52+5:30
पती-पत्नीच्या संसारात पैशांची बचत कशी करायची? याचा खास उपाय ऐश्वर्या नारकर यांनी एका मुलाखतीत सांगितला (aishwarya narkar)

पैशांची बचत करण्यासाठी ऐश्वर्या नारकरांनी सांगितला सोपा अन् महत्वाचा उपाय; म्हणाल्या- "घर घ्यायच्या वेळेस आम्ही..."
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे सेलिब्रिटी कपल गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात काम करत आहेत. ऐश्वर्या - अविनाश यांच्या लग्नालाही अनेक वर्ष झाली. संसारात पैशांचं महत्व आणि पैसे वाचवण्याचा उपाय काय, यावर ऐश्वर्या नारकर यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं. त्यावेळी ऐश्वर्या यांनी सांगितलेला उपाय आपण सर्वांनी फॉलो केलाच पाहिजे. काय म्हणाल्या ऐश्वर्या नारकर बघा.
पैशांची बचत ऐश्वर्या नारकर कशी करतात?
ऐश्वर्या नारकर आरपार या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या की, "जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा आमच्या दोघांचे मिळून वर्षाचे दोन लाख जमायचे. आम्हाला घर घ्यायचं होतं तेव्हाही आम्ही आपल्याकडे एवढंच आहे ना, मग त्याच्याहून कमी असंच बघितलं. जेवढं आहे तेवढ्यातच खर्च भागवायचा असं ठरवलं होतं. आम्ही लाइफस्टाइल मर्यादित ठेवली होती. त्यामुळे आलेल्या पैशांच्या व्यतिरिक्त जास्त पैसा खर्च करायला लागला, असं कधीच झालं नाही. त्यामुळे आमच्या दोघांपैकी एकाला कधी काम नसेल तरी आमचे सेव्हिंगमध्ये पैसे असायचे. त्यात एक-दोन महिन्यात आमचं भागायचं."
ऐश्वर्या नारकर पुढे म्हणाल्या की, "पुढे मी हिंदीमध्ये करायला लागले. थोडी वर्ष गेल्यानंतर मराठीतलं माझं बजेट वाढलं. त्यामुळे छान पैसा यायला लागला. आणि मग तो कम्फर्ट झोन आला. पण आमची लाइफस्टाइल मात्र तीच मर्यादित असल्याने खूप पैसा वाचायला लागला. आमचं सेव्हिंग खूप व्हायला लागलं. मग आम्ही आमची पहिली फिल्म प्रोड्यूस केली (चॅम्पियन). ती फिल्म चालली, नाही चालली, त्याच्यातून पैसा आला, नाही आला असं आम्हाला विचारणारं कोणी नव्हतं. आमचेच पैसे टाकून आम्ही ती फिल्म केली त्यामुळे एक छान प्रोजेक्ट केलं याचं समाधान होतं. हीच सवय पुढेही डेव्हलप होत गेली."
ऐश्वर्या शेवटी महत्वाचं बोलल्या की, "अंथरुण पाहून पाय पसरावेत हे आपल्याला मध्यमवर्गीय घरात शिकवलं जातं. तर ते कुठेतरी आत भिनलंच होतं. मला वाटतं तोच सेफ प्लान असू शकतो आपला की, जेवढं आहे त्याच्याहून थोडंसं कमी खर्च करु. आणि छान राहू." अशाप्रकारे ऐश्वर्या नारकर यांनी पैसे बचतीचा सोपा अन् महत्वाचा उपाय सांगितलाय.