"माझा मृत्यू होईल तेव्हा चेहऱ्यावर मेकअप असावा..."; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली शेवटची इच्छा, चाहते भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:17 IST2026-01-07T14:15:18+5:302026-01-07T14:17:21+5:30
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीने तिची अंतिम इच्छा सांगितली आहे. जी ऐकून तिचे चाहते भावुक झाले आहेत

"माझा मृत्यू होईल तेव्हा चेहऱ्यावर मेकअप असावा..."; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली शेवटची इच्छा, चाहते भावुक
अनेकांच्या मनात त्यांच्या मृत्यूबद्दल काही कल्पना असतात. याशिवाय मरण्याआधीची एक शेवटची इच्छाही काही लोकांच्या मनात असते. मनोरंजनविश्वात सक्रीय असणाऱ्या कलाकारांनीही त्यांची शेवटची इच्छा ठरवली असते. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतंच तिची अंतिम इच्छा सांगितली आहे. ६० वर्षीय अभिनेत्रीने सांगितलेली ही इच्छा ऐकून चाहते भावुक झाले आहेत. ही अभिनेत्री आहे सुधा चंद्रन.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन यांनी अभिनयाप्रती असलेलं प्रेम बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं. सुधा चंद्रन यांनी आपल्या कामाबद्दल एक अत्यंत भावूक इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. त्या म्हणाल्या, "माझी हीच इच्छा आहे की, जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या चेहऱ्यावर मेकअप असावा. म्हणजेच, शेवटच्या श्वासापर्यंत मला अभिनय क्षेत्रात सक्रिय राहायचे आहे."
आपल्या अभिनय प्रवासावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, कॅमेऱ्यासमोर असणे ही त्यांच्यासाठी केवळ नोकरी नाही, तर ती एक साधना आहे. वयाच्या या टप्प्यावरही काम करताना त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. कलेप्रती असलेले हे समर्पण पाहून त्यांचे चाहते आणि मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांचे कौतुक करत आहेत.
सुधा चंद्रन यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. एका अपघातात आपला पाय गमावल्यानंतरही त्यांनी हार न मानता कृत्रिम पायाच्या मदतीने जागतिक स्तरावर नृत्यांगना म्हणून ओळख निर्माण केली. त्यानंतर 'नागिन' सारख्या मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. सुधा चंद्रन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात त्या देवीच्या भक्तीच्या तल्लीन झालेल्या दिसल्या.