"उत्सुकता, हुरहूर आणि दडपण..."; सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मधुराणीने व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:51 IST2025-12-30T17:50:37+5:302025-12-30T17:51:06+5:30
मधुराणी प्रभुलकर मालिकेत सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्यानिमित्ताने मधुराणीने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत

"उत्सुकता, हुरहूर आणि दडपण..."; सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मधुराणीने व्यक्त केल्या भावना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिद्दीला, संघर्षाला आणि दूरदृष्टीला वंदन करणारी स्टार प्रवाहची ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले'च्या सेटचा भव्य दिव्य अनावरण सोहळा नुकताच पार पडला. या खास प्रसंगी मालिकेचे निर्माते तसेच महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे, सावित्रीबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी गोखले आणि मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.
या खास प्रसंगी मालिकेच्या संपूर्ण टीमसोबत स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडेही उपस्थित होते. या अनावरण सोहळ्याने केवळ एका सेटचा पडदा उघडला नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासातील एका जाज्वल्य विचारक्रांतीचा पुनर्जन्म झाला. या भव्यदिव्य सेटमधून सावित्रीबाईंच्या पावलांखालील काटे, समाजाने उभे केलेले अडथळे आणि तरीही न डगमगता पुढे जाणारी त्यांची जिद्द ठळकपणे जाणवते. हा ऐतिहासिक आणि भावस्पर्शी सेट कलादिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून आणि कल्पकतेतून साकारला गेलाय.
याप्रसंगी मधुराणी गोखले आपली भावना व्यक्त करताना म्हणाल्या, ‘सावित्रीबाई फुले युगस्त्री होत्या. इतकं आभाळा एवढं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं मोठी जबाबदारी आहे. आज आपण मुक्तपणे शिकत आहोत, आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात काम करत आहोत, अभिमानाने मिरवत आहोत. पण त्यासाठी दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने इतका मोठा संघर्ष केला.''
''मला सगळ्यांच्या वतीने सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. उत्सुकता, हुरहूर आणि दडपण अश्या संमिश्र भावना आहेत. प्रेक्षकांनी साथ द्यावी हीच अपेक्षा आहे.’ 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका ५ जानेवारीपासून सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर बघायला मिळणार आहे. 'आई कुठे काय करते'नंतर मधुराणीची ही मालिका पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.