ठाणे येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! ४१ वर्षीय अभिनेत्री अनुष्काला अटक, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:44 IST2025-09-05T13:44:07+5:302025-09-05T13:44:27+5:30
ठाणे येथून ४१ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. याशिवाय दोन अभिनेत्रींची याप्रकरणात सुटका करण्यात आली आहे

ठाणे येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! ४१ वर्षीय अभिनेत्री अनुष्काला अटक, नेमकं प्रकरण काय?
मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे येथून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला असून यात एका प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक करण्यात आलीय. ४१ वर्षीय अभिनेत्रीला ठाणे जिल्ह्यात सेक्स रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या अभिनेत्रीचे नाव अनुष्का मोनी मोहन दास असं आहे. पोलिसांनी सापळा रचून तिला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका मॉलमध्ये पैसे घेताना रंगेहाथ पकडले. तिच्या या रॅकेटमधून पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे, ज्या टीव्ही मालिका आणि बंगाली सिनेमामध्ये काम करतात.
पोलिसांनी रचला सापळा, अभिनेत्री गजाआड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अनुष्का मोनी मोहन दास यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अनुष्काने त्यांना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशीमीरा येथील एका मॉलमध्ये बोलावले. पोलीस पथकाने या ठिकाणी छापा टाकून तिला अटक केली.
या प्रकरणी अनुष्का दासवर भारतीय न्याय संहिता कलम 143(3) (मानवी तस्करी) आणि अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (PITA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका केलेल्या दोन्ही महिलांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी आश्रयगृहात पाठवण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पूर्ण तपास सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणी सामील आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी ABP वृत्तवाहिनीशी बोलताना असं सांगितलं की, ''हे रॅकेट श्रीमंत वर्गातील लोकांसाठी चालवले जात होते. आरोपी महिला अनुष्का दास ही या लोकांसाठी मध्यस्थी म्हणून काम करत होती. या घटनेमुळे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे'', अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.