Bigg Boss Marathi 6: काय सांगता! श्रेयस तळपदे 'बिग बॉस मराठी ६' मध्ये जाणार? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:43 IST2026-01-08T09:40:37+5:302026-01-08T09:43:16+5:30
Bigg Boss Marathi Season 6 Contestants: श्रेयस तळपदे बिग बॉस मराठी ६ मध्ये एन्ट्री घेणार अशी चर्चा आहे. यावर श्रेयसनेच मौन सोडून स्पष्टीकरण दिलं आहे

Bigg Boss Marathi 6: काय सांगता! श्रेयस तळपदे 'बिग बॉस मराठी ६' मध्ये जाणार? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला...
Bigg Boss Marathi 6 Contestants: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन (Bigg Boss Marathi 6) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, मराठी आणि बॉलिवूडचा सुपरस्टार श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याचे नाव चर्चेत आले आहे. श्रेयस स्पर्धक म्हणून घरात जाणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. आता यावर स्वतः श्रेयसने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे चर्चा?
'पिंकविला'ने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस तळपदे याने 'बिग बॉस मराठी ६' मध्ये स्पर्धक म्हणून जाण्यासाठी होकार दिला आहे, अशी बातमी समोर आली आहे. रितेश देशमुख या सीझनचा होस्ट असल्याने, त्याचा जवळचा मित्र श्रेयसची एन्ट्री शोसाठी मोठा 'ट्विस्ट' ठरेल, असे म्हटले जात होते. श्रेयसची लोकप्रियता आणि त्याचा शांत स्वभाव पाहता तो या खेळासाठी एक सक्षम स्पर्धक ठरू शकतो, असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला.
आता या सर्व चर्चांवर श्रेयसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. झूमला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने सांगितले की, "आजकाल अशा गोष्टी घडणं सामान्य झालं आहे. या निव्वळ अफवा आहेत. कृपया याकडे दुर्लक्ष करा. दुर्दैवाने, कलाकारांना खूप सहज टार्गेट केलं जातं आणि काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात." श्रेयसच्या या स्पष्टीकरणामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये काही प्रमाणात निराशा झाली असली, तरी अधिकृत माहिती समोर आल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
यंदाच्या सीझनचे सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करत आहे. रितेश आणि श्रेयस हे खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी 'हाऊसफुल्ल' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. जर श्रेयस स्पर्धक म्हणून आला असता, तर 'भाऊचा धक्का' मध्ये या दोन मित्रांची जुगलबंदी पाहणे प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरली असती. 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड प्रीमियर ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. जरी श्रेयस यात स्पर्धक म्हणून दिसणार नसला, तरी या सीझनमध्ये अनेक मोठे चेहरे आणि अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळतील, अशी खात्री निर्मात्यांनी दिली आहे. श्रेयस सध्या त्याच्या आगामी चित्रपट आणि प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे.