ट्रेनमधून माणसं पडून मरतात! भ्रष्ट कारभारावर मिलिंद गवळी स्पष्टच बोलले, म्हणाले- "श्रीमंताच्या बापाने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 09:47 IST2025-07-31T09:46:56+5:302025-07-31T09:47:27+5:30
काही दिवसांपूर्वीच घडलेल्या रेल्वे अपघातावरही त्यांनी पोस्टमधून दु:ख व्यक्त केलं होतं. आता पुन्हा मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे.

ट्रेनमधून माणसं पडून मरतात! भ्रष्ट कारभारावर मिलिंद गवळी स्पष्टच बोलले, म्हणाले- "श्रीमंताच्या बापाने..."
मिलिंद गवळी हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. अनेक मालिका आणि सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयासोबतच मिलिंद गवळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखले जातात. मिलिंद गवळी सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी परखडपणे त्यांची मतं मांडतात. समाजातील घडामोडींवरही ते सोशल मीडियावर व्यक्त होतात. त्यांच्या पोस्ट या अनेकदा चर्चेचा विषय असतो. काही दिवसांपूर्वीच घडलेल्या रेल्वे अपघातावरही त्यांनी पोस्टमधून दु:ख व्यक्त केलं होतं. आता पुन्हा मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे.
मिलिंद गवळी यांनी टेली गप्पा या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, "सोशल मीडियावरुन आपल्याला व्यक्त व्हायला मिळतं. ट्रेनमधून ५ माणसं पडतात आणि मरतात. तेव्हा मला दु:ख होतं. ते दु:ख व्यक्त करायचं असेल तर मी याला त्याला सांगणार नाही. पण मला वाईट वाटतं. त्यांच्यात माझंही कोणीतरी असू शकतं. मग मी व्यक्त होतो की आपल्याकडे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि थर्ड क्लास का आहे? स्वातंत्र्याच्या आधी ब्रिटिशांनी थर्ड क्लास काढला होता. ते आपल्या देशावर राज्य करायला आले होते. पण, ते गेल्यानंतर आपण गुलाम नाही ना. आपण स्वतंत्र झालो मग आपणच आपल्या माणसांना सेकंड क्लास सिटिझन का करतो?"
"तुम्हाला कोणी अधिकार दिला की त्याच्या बापाकडे कमी पैसे म्हणून तो सेकंड क्लास सिटिझन...नाही तो भारतीय आहे. तुम्ही जेव्हा रेल्वे बनवता किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट बनवता मग एकच सीट द्या ना. गरीबाचं पोरगं असेल किंवा श्रीमंताचं...हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. श्रीमंताच्या बापाने त्याला गाडी घेऊन दिलीये ना... त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तरी भेदभाव करू नका. प्रवाशांना लटकत जायला देऊ नका. १२ डब्यांची गाडी २४ डब्यांची करा. काहीतरी करा...रेल्वेमध्ये काय प्रॉब्लेम आहेत मला माहीत नाही. पण, तुम्हाला जर ७०-७५ वर्षांत प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळत नसेल म्हणजे कुठेतरी गडबड आहे", अशी संपप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे राग व्यक्त करत ते म्हणाले, "बाहेरच्या देशात प्रॉब्लेम सुटतात. म्हणजे कुठेतरी तुमच्या देशात यावर पर्याय निघत नाही. कारण तुम्हाला रस्ता बनवताना टेंडर काढा आणि त्यातून पैसे खा. १० रुपये लागणार आहेत त्यातले ८० तुम्ही आपापसात वाटून घेतले आणि २० चा रस्ता केला तर खड्डा पडणारच ना. मला कुठेतरी व्यक्त व्हायचं असतं. मला यांच्या नादी लागायचं नाही. मी यांची नावं घेतली तर हे मला काम करू देणार नाहीत. माझं काम अभिनय करणं आहे. पण, अभिनेता आहे म्हणून मला मन नाही असं नाहीये. माझ्या देशातला माणूस मरतो तर मला दु:ख होतं. आणि मला ते व्यक्त करायचंय".