CID २ मधील ACP प्रद्युम्नचा 'मृत्यू' खरा की TRP स्टंट, शिवाजी साटम यांनी सोडलं मौन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 13:53 IST2025-04-06T13:52:22+5:302025-04-06T13:53:28+5:30
'CID २'मध्ये एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू खरंच झाला? काय आहे सत्य

CID २ मधील ACP प्रद्युम्नचा 'मृत्यू' खरा की TRP स्टंट, शिवाजी साटम यांनी सोडलं मौन, म्हणाले...
Shivaji Satam: छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली सीआयडी (CID) ही मालिका आजही प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेने तब्बल २० वर्ष प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. २०१८ साली या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला होता. पण, काही महिन्यांपूर्वीच मालिका सीझन २ सह पुन्हा सुरु झाली. या मालिकेतील अभिजीत, दया आणि एसीपी प्रद्युम्न हे पात्रे प्रेक्षकांचे अगदीच लाडके आहेत. यात शिवाजी साटम हे साकारत असलेले एसीपी प्रद्युम्न या पात्राचे लोकांच्या मनात एक विशेष स्थान आहे. पण, एसीपी प्रद्युम्न या व्यक्तिरेखेचा ट्रॅक सीआयडीमध्ये संपणार असल्याची चर्चा आहे.
'CID २'मध्ये एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. सोनी टीव्हीने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत अधिकृतपणे तसं जाहीरही केलं आहे. पण, दुसरीकडे अशीही चर्चा सुरू आहे की 'सीआयडी'ला हिट करण्यासाठी निर्मात्यांनी एसीपी प्रद्युम्नच्या 'मृत्यू'चा ट्रॅक प्लॅन केला आहे. दिव्य मराठीनं दिलेल्या रिपोर्टनुसार, "एसीपी प्रद्युम्नचा मृत्यू खरा नाही. हा फक्त सस्पेन्स निर्माण करण्याचा एक मार्ग आहे". टीआरपीच्या आकडेवारीत वाढ करण्यासाठी ACP प्रद्युम्नचा 'मृत्यू' केवळ स्टंट असल्याचं बोललं जातं आहे.
दरम्यान, शिवाजी साटम यांनीही त्यांच्या ACP प्रद्युम्नचा 'मृत्यू' ट्रॅकवर Bombay Times ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. ते म्हणाले, "मला याबाबत काहीच कल्पना नाही. मे महिन्यात परदेशात राहणाऱ्या आपल्या मुलासोबत वेळ घालवण्यासाठी सुटी घेतली आहे. निर्मात्यांना मालिकेत पुढे काय होणार आहे याची कल्पना आहे. जर माझी भूमिका संपली असेल तर माझं काही म्हणणं नाही. पण मला माझी भूमिका संपली आहे की नाही यासंदर्भात काही कळवण्यात आलेलं नाही. मी सध्या मालिकेसाठी शुटिंग करत नाहीये".
याशिवाय, गेल्या २२ वर्षांपासून एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारण्याचा त्यांना आनंद मिळत आहे. सीआयडीने त्यांना खूप काही दिल्याचं त्यांनी म्हटलं. 'कसौटी जिंदगी की २' फेम पार्थ समथान लवकरच 'सीआयडी २' टीमचा भाग होऊ शकतो अशी चर्चा आहे. तथापि, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पहिला सीझन बीपी सिंग यांनी तयार केला होता आणि प्रदीप उप्पूर यांनी त्याची निर्मिती केली होती. आता नवीन सीझन बनिजय एशिया बनवत आहे.