"आव्हानांना तोंड देत एकटीच्या बळावर तू..."; पत्नी कृतिकासाठी अभिषेकची खास पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:26 IST2025-09-15T13:25:43+5:302025-09-15T13:26:28+5:30
अभिनेत्री कृतिका देवची लंपडाव ही नवी मालिका सुरु होतेय. त्यानिमित्त कृतिकाचा पती अभिषेकने सोशल मीडियावर केलेली खास पोस्ट चर्चेत आहे

"आव्हानांना तोंड देत एकटीच्या बळावर तू..."; पत्नी कृतिकासाठी अभिषेकची खास पोस्ट चर्चेत
आजपासून स्टार प्रवाहवर 'लपंडाव' ही नवी मालिका सुरु होतेय. या मालिकेत 'आई कुठे काय करते' फेम अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री कृतिका देव प्रमुख भूमिकेत आहे. कृतिकाच्या करिअरमध्ये अभिषेक देशमुखने कायमच प्रोत्साहन दिलंय. त्यामुळे पत्नीची नवी मालिका सुरु होण्यापूर्वी अभिषेकने खास पोस्ट लिहून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेकने लिहिलेली ही खास पोस्ट चर्चेत आहे.
अभिषेकने कृतिकाच्या 'लपंडाव' मालिकेतील फोटो शेअर करुन लिहिलंय की, ''कृतिका, नवीन मालिकेसाठी खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा..आजपासून नवीन सुरुवात होतेय आणि ती चांगलीच होणार..अगदी लहानपणापासून तू नृत्य शिकलीस, अभिनय केलास, तुझं कलेवरचं प्रेम, श्रद्धा, आत्मियता सिद्ध केलीस, पुढेही करशील..आयुष्यातल्या कटू आव्हानांना जिद्दीनं तोंड देत एकटीच्या बळावर तू वेगवेगळ्या माध्यमातून काम केलंस,अनेक संधी मिळाल्या, काही हुकल्या.. हा संधी आणि संघर्षाचा “लपंडाव” ह्या क्षेत्रात कुणाला चुकलाय?''
''आता Television ह्या माध्यमात सुरुवात होते आहे..हा मालिकेचा प्रवास किती असतो हे कुणालाच ठाऊक नसतं! आणि हीच त्याची गंमत असते..हेही सोपं नसतं पण ते Enjoy करायचं, आपण ह्या “प्रवाहाचा”आनंद घ्यायचा, कधी नसेल मिळत तर तो शोधायचा..दररोज..! आजपर्यंत तू फक्त स्वतःशी स्पर्धा केलीस आणि पुढे आलीस..आत्ताही तेच करशील ह्याची खात्री आहे..Proud of you! खुप खुप आदर आणि भरभरून प्रेम.'' अशी सुंदर पोस्ट अभिषेकने लिहिली आहे. या पोस्टखाली कृतिका कमेंट करत लिहिते, ''इतकं छान कधी कोणी लिहीतं का? ’Thank you’ would be an understatement!! तुला तर सगळंच माहितीये.''
अशाप्रकारे अभिषेक आणि कृतिकाने एकमेकांबद्दल प्रेम दर्शवलं आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देवला आपण अनेक सिनेमांच्या माध्यमातून भेटलोय. स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या लपंडाव मालिकेतून कृतिका मालिका विश्वात दमदार पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत कृतिका सखी कामत हे पात्र साकारणार आहे.