'आई कुठे...'मधले बापलेक नव्या मालिकेत! मिलिंद गवळींनंतर 'या' अभिनेत्याची 'वचन दिले तू मला'मध्ये वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 16:24 IST2025-12-14T16:22:47+5:302025-12-14T16:24:02+5:30
'आई कुठे काय करते'मध्ये अनिरुद्धची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले मिलिंद गवळी 'वचन दिले तू मला' मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिलिंद गवळींपाठोपाठ 'आई कुठे काय करते'मधील आणखी एका अभिनेत्याची या मालिकेत वर्णी लागली आहे.

'आई कुठे...'मधले बापलेक नव्या मालिकेत! मिलिंद गवळींनंतर 'या' अभिनेत्याची 'वचन दिले तू मला'मध्ये वर्णी
स्टार प्रवाह वाहिनी 'वचन दिले तू मला' ही नवी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या प्रोमोपासूनच चाहत्यांना उत्सुकता होती. लवकरच ही मालिका सुरू होणार आहे. 'वचन दिले तू मला' मालिकेत अभिनेत्री अनुष्का सरकटे, इंद्रनील कामत मुख्य भूमिकेत आहेत. तर 'आई कुठे काय करते'मध्ये अनिरुद्धची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले मिलिंद गवळी 'वचन दिले तू मला' मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिलिंद गवळींपाठोपाठ 'आई कुठे काय करते'मधील आणखी एका अभिनेत्याची या मालिकेत वर्णी लागली आहे.
'वचन दिले तू मला' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत 'आई कुठे काय करते'मध्ये अभिषेकची भूमिका साकारलेला अभिनेता निरंजन कुलकर्णी दिसणार आहे. निरंजन या मालिकेत आदित्य जहागीरदार हे पात्र साकारणार आहे. व्हिडीओ शेअर करत निरंजनने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनीही निरंजनला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे निरंजन या मालिकेतही मिलिंद गवळींच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'वचन दिले तू मला' मालिकेत अभिनेता मिलिंद गवळी हे वकिलाच्या भूमिकेत आहेत. ते हर्षवर्धन जहागीरदार ही भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे 'आई कुठे काय करते'मधली बापलेकाची जोडी 'वचन दिले तू मला'मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. १५ डिसेंबरपासून रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.