धक्कादायक! नशेत अभिनेत्याने २९ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीला छेडलं, होळी पार्टीतील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 09:31 IST2025-03-16T09:30:53+5:302025-03-16T09:31:16+5:30
धुळवडीच्या पार्टीत अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोरं आलं आहे. होळी पार्टीत नशेत असलेल्या अभिनेत्याने २९ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीची छेड काढली आहे. अभिनेत्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

धक्कादायक! नशेत अभिनेत्याने २९ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीला छेडलं, होळी पार्टीतील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल
सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. अनेक ठिकाणी धुळवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अशाच एका धुळवडीच्या पार्टीत अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोरं आलं आहे. होळी पार्टीत नशेत असलेल्या अभिनेत्याने २९ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीची छेड काढली आहे. १४ मार्चला ही घटना घडली. अभिनेत्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेनंतर अभिनेत्रीने तातडीने अंबोली पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीने तिच्या सहकलाकारावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. छेडछाड करणाऱ्या अभिनेत्याविरोधात पोलिसांनी बीएनएस धारा ७५(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अभिनेत्री ही २९ वर्षांची आहे. तिने अनेक मालिका आणि काही सीरिजमध्येही काम केलं आहे.
अभिनेत्रीने सांगितलं नेमकं काय घडलं?
टेरेसवर होळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा ३० वर्षीय सहकलाकाराने नशेत तिची छेड काढली. "तो माझ्यावर आणि पार्टीतील इतर महिलांवर रंग टाकण्याचा प्रयत्न करत होता. मला त्याच्यासोबत होळी खेळायची नव्हती. म्हणून मी त्याला विरोध केला आणि त्याच्यापासून दूर गेले. मी टेरेसवर असलेल्या पाणीपुरी स्टॉलच्या मागे होते. पण, तो माझ्या मागे आला आणि त्याने माझ्यावर रंग टाकला. मी माझा चेहरा लपवला. पण, त्याने मला जबरदस्तीने पकडलं आणि माझ्या गालावर रंग लावला. त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी त्याला ढकललं. या प्रकारामुळे मला धक्का बसला होता. त्यानंतर मी सरळ वॉशरुममध्ये गेले", असं अभिनेत्रीने सांगितलं आहे.