विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:12 IST2025-10-27T13:12:21+5:302025-10-27T13:12:51+5:30
दाक्षिणात्य सिनेसृष्टीलाही कोकणच्या सौंदर्याची भुरळ, 'या' गावात आली टीम

विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
'दशावतार' सिनेमामुळे मनोरंजनविश्वात कोकणची हवा आहे. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणाची सर्वांनाच भुरळ पडली आहे. अनेक मराठी सिनेमे कोकणात शूट झाले आहेत. 'दशावतार'मधून आपल्याला कोकणातील जंगलही बघायला मिळालं. दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाही त्याच्या आगामी सिनेमासाठी कोकणात पोहोचला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
विजय देवरकोंडाचा 'रावडी जनार्दन' सिनेमा येणार आहे. त्याचं शूटिंग सध्या सुरु आहे. अभिनेत्री कीर्ती सुरेशसोबत सध्या तो शूटिंग करत आहे. 'रावडी जनार्दन' सिनेमाची टीम रत्नागिरीतील सैतवडे गावात मुक्कामी आहे. या सुंदर गावात ब्रिटीशकालीन सेट उभारण्यात आला आहे. कारण सिनेमाची गोष्ट १९०० सालची आहे. गुंबद ग्रामपंचायत हद्दीतील 'द मॉडेल इंग्लिश स्कुल'च्या पटांगणावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा सेट आहे. गावातील समुद्रकिनारी विजय आणि कीर्ती शूट करत आहेत. समुद्रातील होडीत दोघांचा एक सीन शूट होत आहे त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सैतवडेनंतर सिनेमाचं शूट शेजारच्या गावात वरवडे मध्ये होणार आहे. विजय देवरकोंडाची एक झलक पाहण्यासाठी गावकरीही गर्दी करत आहेत. तसंच आजूबाजूच्या आणखी काही गावांमध्येही सिनेमाचं चित्रीकरण होणार आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीलाही कोकणच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे.