"कोणीही दैव पंरपरेची मस्करी करु नये"; ऋषभ शेट्टीचा रणवीर सिंगला टोला? अभिनेता स्पष्टच म्हणाला-
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 10:44 IST2025-12-16T10:35:41+5:302025-12-16T10:44:24+5:30
रणवीर सिंगने कांतारामधील दैव परंपरेची खिल्ली उडवली. पण आता यावर ऋषभ शेट्टीने त्याचं परखड मत व्यक्त केलं आहे

"कोणीही दैव पंरपरेची मस्करी करु नये"; ऋषभ शेट्टीचा रणवीर सिंगला टोला? अभिनेता स्पष्टच म्हणाला-
काही आठवड्यांपूर्वी अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) गोव्यातील इफ्फी फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'कांतारा' चित्रपटातील 'दैव'ची नक्कल केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेनंतर रणवीर सिंगला सोशल मीडियावर टीकेला सामोरं जावं लागलं. आता 'कांतारा'चा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीने (Rishab Shetty) या संपूर्ण प्रकरणावर जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारची नक्कल किंवा सादरीकरणामुळे 'मला अस्वस्थ वाटतं', असं त्याने स्पष्ट केले आहे.
ऋषभ शेट्टी काय म्हणाला?
चेन्नई येथे एका कार्यक्रमात बोलताना ऋषभ शेट्टीने रणवीर सिंगचे नाव न घेता, या विषयावर भाष्य केले. ऋषभ शेट्टी भावना व्यक्त करताना म्हणाला, “कोणी नक्कल करतं तेव्हा मला अस्वस्थ वाटतं. चित्रपटाचा मोठा भाग जरी अभिनय आणि परफॉर्मन्स असला तरी, चित्रपटातील 'दैव' हा घटक खूप संवेदनशील आणि पवित्र आहे. मी जिथे कुठे जातो, तिथे लोकांना विनंती करतो की त्यांनी मंचावर त्याचे सादरीकरण करू नये किंवा त्याची मस्करी करू नये. हे आमच्याशी भावनिकरित्या खूप खोलवर जोडलेले आहे.”
Dhurandhar Ranveer Singh
— ✎𝒜 πundhati🌵🍉🇵🇸 (@Polytikles) December 2, 2025
Vs
Kantara Rishab Shetty
Here's the video, everybody is talking about.#Kantarapic.twitter.com/xb5tW4R8RD
नेमका वाद काय होता?
गोव्यामध्ये आयोजित 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (IFFI) दरम्यान अभिनेता रणवीर सिंगने 'कांतारा' चित्रपटातील 'चामुंडी दैव'ची नक्कल केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रणवीरवर टीका केली. 'दैव' किंवा 'भूत कोला' ही तुलू आणि कर्नाटकच्या किनारी भागातील एक पवित्र धार्मिक परंपरा आहे, ज्याचा आदर न केल्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला होता.
रणवीर सिंगने मागितली होती माफी
सोशल मीडियावरील मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर रणवीर सिंगने सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर माफी मागितली होती. त्याने लिहिले होते की, आपण केवळ ऋषभ शेट्टीच्या त्या दृश्यातील अभिनयाची प्रशंसा करण्यासाठी ते सादरीकरण केले होते. रणवीरने पुढे लिहिले होते, "अभिनेता म्हणून मला माहीत आहे की त्याने ज्या पद्धतीने हे खास दृश्य सादर केले, त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली असेल आणि त्यासाठी माझ्या मनात त्याचे खूप कौतुक आहे. जर माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो."
पण आता ऋषभ शेट्टीने प्रतिक्रिया देताना रणवीर सिंगचं नाव घेतलं नसलं तरीही रणवीरने सर्वांसमोर 'दैव'ची जी जाहीर नक्कल केली त्यामुळे ऋषभला नक्कीच वाईट वाटलं असणार यात शंका नाही. ऋषभच्या 'कांतारा चाप्टर १'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे.