'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:13 IST2025-10-29T16:12:47+5:302025-10-29T16:13:42+5:30
'कौन बनेगा करोडपती'शोमध्ये अभिनेता ऋषभ शेट्टी हॉटसीटवर आला होता. तेव्हा त्याने मराठी नाटकाचा किस्सा सांगितला.

'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
'कांतारा' या सिनेमातून स्टार झालेला कन्नड अभिनेता ऋषभ शेट्टी. या सिनेमामुळे त्याचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चाहते झाले आहेत. ऋषभ शेट्टी अगदीच सामान्य कुटुंबातून इथपर्यंत पोहोचला आहे. अभिनयाची आवड त्याला आधीपासूनच होती. म्हणूनच तो कॉलेजमध्ये असताना थिएटरकडे वळला होता. तिथे त्याने विजय तेंडुलकर लिखित 'घाशीराम कोतवाल' हे नाटक कन्नडमध्ये भाषांतर करुन त्यात घाशीरामची भूमिका साकारली होती. नुकतंच त्याने अमिताभ बच्चन यांच्या केबीसी शोमध्ये हजेरी लावली. तिथे त्याने हा किस्सा सांगितला.
'कौन बनेगा करोडपती'शोमध्ये अभिनेता ऋषभ शेट्टी हॉटसीटवर आला होता. यावेळी अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, "लहान असतानाच मी अभिनयाकडे आकर्षित झालो होतो. इयत्ता सहावीपासून मी दरवर्षी कार्यक्रमांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करायचो. मी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. त्यामुळे आमची आर्थिक स्थिती जेमतेमच होती. माझे वडील ज्योतिषी होते. मी घराला हातभार म्हणून छोटं मोठं काहीतरी काम करायचं ठरवलं."
तो पुढे म्हणाला, "मग मला बंगळुरुतील थिएटरमध्ये एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली. मराठी नाटक 'घाशीराम कोतवाल' कन्नडमध्ये भाषांतरित करुन आम्ही ते तिथे सादर केलं होतं. त्यात मी घाशीरामची भूमिका साकारायची संधी मिळाली. त्यासाठी मला युनिव्हर्सिटीकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला."
आज ऋषभ शेट्टी कन्नडचा सुपरस्टार बनला आहे. त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'कांतारा चॅप्टर १'ने जगभरात तब्बल ८१२ कोटी रुपये इतका प्रचंड गल्ला जमवला आहे. ज्यांना सिनेमा टॉकीजमध्ये पाहता आलेला नाही त्यांना आता घरबसल्या पाहता येणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सिनेमा प्राईम व्हिडीओवर येत आहे.