रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 10:51 IST2025-10-29T10:51:06+5:302025-10-29T10:51:53+5:30
मी माझ्या मुलांसाठी युद्धही लढेन.., रश्मिका मंदानाचं वक्तव्य चर्चेत

रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
रश्मिका मंदाना सध्या हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आघाडीवर आहे. बऱ्याच सिनेमांमध्ये रश्मिकाला मुख्य अभिनेत्री म्हणून पसंती मिळते. त्यामुळे तिचा भाव चांगलाच वधारला आहे. नुकताच तिचा 'थामा' रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. रशअमिका फक्त प्रोफेशनलच नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. विजय देवरकोंडासोबत साखरपुडा झाल्याची बातमी तिने जवळपास कन्फर्मच केली आहे. तर आता तिने आई होण्यावरही प्रतिक्रिया दिली आहे.
रश्मिका मंदानाचा 'द गर्लफ्रेंड' सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने तिने नुकतीच मुलाखत दिली. तेव्हा भविष्यात होणाऱ्या मूलाबाळाच्या निर्णयावर ती म्हणाली, "मी अजून आई झालेही नाही तरी मला आतापासूनच असं वाटत आहे. मला मूलं होतील या विचारानेच मी खूश होते. ते अजून जन्मालाही आलेले नाहीत पण मला आतापासूनच खूप प्रेम, जिव्हाळा वाटतो. मला त्यांच्यासाठी सगळं काही करायचं आहे. मसला त्यांना सुरक्षित ठेवायचं आहे. त्यांच्यासाठी मला युद्धही करावं लागलं तर मी करेन. त्यासाठी मला इतकं फिट व्हायचं आहे की मी युद्धही लढू शकेन. मी आतापासूनच या सगळ्याबद्दल विचार करत आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यासाठी ठराविक वयाची अट मी स्वत:लाच घातली आहे."
ती पुढे म्हणाली, "वयाच्या २० ते ३० वर्षात मान खाली घालून फक्त काम करायचं हे माझ्या डोक्यात कायम होतं. समाजानेच आपल्या डोक्यात हे विचार घातलेले असतात. आपल्याला कमवायचं असतं. नंतर ३० ते ४० या वयात आपल्याला काम आणि वैयक्तिक आयुष्य दोन्हीत संतुलन साधायचं असतं. माझ्याही आयुष्यात हे असंच व्हावं असा माझा प्रयत्न आहे. चाळीशीनंतर काय करायचं एवढा अजून मी विचार केला नाही."
रश्मिका मंदाना अनेक वर्षांपासून विजय देवरकोंडाला डेट करत आहे. दोघांची जोडी 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड'मध्ये एकत्र दिसली होती. तिथूनच त्यांच्या केमिस्ट्रीला सुरुवात झाली. लवकरच दोघं लग्नगाठ बांधणार आहेत. ते कधी लग्न करणार यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.