"मी खूप काम करते...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मुद्द्यावर रश्मिका मंदानाची प्रतिक्रिया चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:04 IST2025-10-28T18:03:47+5:302025-10-28T18:04:26+5:30
मी भविष्याचा विचार करते..., रश्मिका मंदाना स्पष्टच म्हणाली

"मी खूप काम करते...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मुद्द्यावर रश्मिका मंदानाची प्रतिक्रिया चर्चेत
दीपिका पादुकोणने सिनेसृष्टीत आठ तासांच्या शिफ्टचा मुद्दा आणला आणि यावरुन बरीच चर्चा झाली. दीपिकाने आई झाल्यानंतर सिनेमा करण्यापूर्वी बऱ्याच अटी ठेवल्या. त्यात आठ तासांचीच शिफ्ट ही अट होती. यावरुन संदीप रेड्डी वांगाने तिला सिनेमातूनच बाहेरचा रस्ता दाखवला. या मुद्द्यावरुन अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं. आता दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
रश्मिका मंदानाचा 'द गर्लफ्रेंड' सिनेमा येणार आहे. सिनेमाच्या प्रमोशननिमित्त तिने Glute ला मुलाखत दिली. यावेळी ती आठ तासांच्या शिफ्टच्या मुद्द्यावर म्हणाली, "मी खूप जास्त काम करते आणि हे अजिबातच योग्य नाही. असं करु नका. तुमच्याकडून जे शक्य आहे तेच करा. आठ तास, नऊ-दहा तास काम करा. कारण यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे."
ती पुढे म्हणाली, "सध्या या मुद्द्यावरुन बरीच चर्चा सुरु आहे.मलाही वाटतं की इंडस्ट्रीत ९ ते ६ अशी कॉर्पोरेट सारखी शिफ्ट असावी. जेणेकरुन आम्हालाही आमच्या कुटुंबाला वेळ देता येईल. झोप पूर्ण करता येईल. व्यायाम करता येईल. यामुळे मला भविष्यात काही त्रास होणार नाही. मी माझ्या भविष्याचा विचार करते. पण मला माझ्या टीमची काळजी वाटते. त्यांनी एखादं लोकेशन बघितलेलं असतं. तिथे वेळेची मर्यादा असते. त्या वेळेत भरपूर शूटिंग पूर्ण करावंच लागतं आणि म्हणून मी ते करते. मी खूप काम करते आणि ते मी स्वत:च माझ्यावर ओढवून घेतलं आहे. पण हे नक्कीच योग्य नाही."
रश्मिकाचा 'द गर्लफ्रेंड' ७ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात तिने धीक्षित शेट्टीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. तिच्या या सिनेमासाठी चाहते उत्सुक आहेत.