रजनीकांत-आमिर खानचा सुपरहिट 'कुली' सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज; कधी? कुठे? पाहाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 16:45 IST2025-09-04T16:44:35+5:302025-09-04T16:45:31+5:30
'कुली' सिनेमाच्या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा झाली. जाणून घ्या याबद्दल

रजनीकांत-आमिर खानचा सुपरहिट 'कुली' सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज; कधी? कुठे? पाहाल
सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'कुली' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्यानंतर, आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित या चित्रपटाचे ओटीटी हक्क ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने विकत घेतले आहेत. या चित्रपटाने ओटीटी हक्कांच्या बाबतीतही मोठा विक्रम केला आहे.
या तारखेला 'कुली' येणार ओटीटीवर
प्राईम व्हिडीओने आज 'कुली'च्या ओटीटी रिलीजसंबंधी अधिकृत घोषणा केली. हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२५ पासून प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होईल. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये उपलब्ध असेल. १४ ऑगस्ट २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबतच नागार्जुन, श्रुती हासन, आणि उपेन्द्र यांसारखे मोठे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तसेच, यात आमिर खानचा स्पेशल कॅमिओ देखील आहे. चित्रपटातील दमदार ॲक्शन आणि रजनीकांत यांचा खास स्वॅग पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
बॉक्स ऑफिस कलेक्शन
'कुली'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने भारतात २२९ कोटी रुपयांची कमाई केली. २० दिवसांत चित्रपटाने २८१ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे, ज्यामुळे हा चित्रपट २०२५ मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक बनला आहे. आता प्रेक्षकांना 'कुली' घरबसल्या पाहता येणार असल्याने सर्वांना या सिनेमाविषयी उत्सुकता आहे.