'पुष्पा'च्या डबिंगवेळी श्रेयस तळपदेने लढवली अशी शक्कल; म्हणाला, 'बोलताना तोंडात...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:00 IST2024-12-06T10:59:46+5:302024-12-06T11:00:09+5:30

नुकतंच श्रेयसने 'पुष्पा'चं डबिंग करतानाचं एक सीक्रेट उघड केलं. तर अल्लू अर्जुनला कधी भेटला का यावरही उत्तर दिलं.

Pushpa 2 The Rule Shreyas Talpade put cotton in mouth while dubbing for allu arjun | 'पुष्पा'च्या डबिंगवेळी श्रेयस तळपदेने लढवली अशी शक्कल; म्हणाला, 'बोलताना तोंडात...'

'पुष्पा'च्या डबिंगवेळी श्रेयस तळपदेने लढवली अशी शक्कल; म्हणाला, 'बोलताना तोंडात...'

सध्या मनोरंजनविश्वात अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun)  'पुष्पा २' (Pushpa 2)चा धुमाकूळ आहे. 'पुष्पा २: द रुल' थिएटरमध्ये धडकला आहे. ठिकठिकाणी सिनेमा हाऊसफुल सुरु आहे. हिंदी प्रेक्षकही हा दाक्षिणात्य सिनेमा एन्जॉय करत आहेत. अर्थात आपल्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेनेच (Shreyas Talpade) यातही आवाज दिला आहे. नुकतंच श्रेयसने पुष्पा चं डबिंग करतानाचं एक सीक्रेट उघड केलं. तर अल्लू अर्जुनला कधी भेटला का यावरही उत्तर दिलं.

२०२१ साली आलेल्या 'पुष्पा: द राईज' सिनेमासाठी श्रेयस तळपदेने डबिंग केलं होतं. अल्लू अर्जुनसाठी त्याने दमदार आवाज दिला. त्याच्या आवाजाचं खूप कौतुक झालं. खुद्द अल्लू अर्जुननेही डबिंगचं कौतुक केलं. यामुळे आता सीक्वेलसाठी डबिंग करताना श्रेयस थोडा नर्व्हस झाला होता. 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस म्हणाला, "माझ्या पोटात गोळा आला होता. थोडा नर्व्हस झालो होतो. कारण पुष्पाच्या पहिल्या पार्टसाठी डबिंग केलं तेव्हा कोणताच दबाव नव्हता. एवढं कौतुक होईल हे कोणालाच माहित नव्हतं. त्यामुळे यावेळी जरा दबाव वाटला. मला वाटलं की मी जाईन आणि माझं काम करेन. अल्लू अर्जुननेच खरंतर कमाल केली आहे. मला फक्त त्याच्या मेहनतीला न्याय द्यायचा होता. सगळ्यांना माझं काम आवडलं याचा मला आनंदच आहे."

तो पुढे म्हणाला, "यावेळी अल्लूचा सिनेमातील स्वॅग आणखी जास्त होता. तो स्वॅग मला तसाच आवाजातूनही दाखवायचा होता. पहिल्या पार्टमध्ये तो उभरता होता. पण यामध्ये त्याला आत्मविश्वास आहे. तो राज्य करत आहे आणि मला ते आवाजातून आणायचं होतं. त्याची बॉडीलँग्वेज आणि माझा आवाज जुळणं गरजेचं होतं. 'मी राज्य करतोय' ही बाब दाखवून द्यायची होतं. खरं सांगायचं तर यावेळी मी मागच्या वेळेसपेक्षा जास्त वेळ घेतला. यावेळी मी प्रत्येकी २ तासांचे १४ सेशन केले. अतिशय बारकाईने काम केलं. जर एखादा सीन करुन मी खूश नसेल तर मी परत करायचो. एखाद्या वेळी असं व्हायचं की माझा आवाज सूट होत नाहीए तेव्हा मी सरळ थांबायचो. मला काहीच तडजोड करायची नव्हती. आज प्रतिक्रिया ऐकल्यानंतर त्या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटत आहे."

श्रेयस शेवटी म्हणाला, "मी सिनेमात काहीतरी व्हॅल्यू अॅड केली याचा मला आनंद आहे. तसंच यावेळी पुष्पा सिनेमात एक तर मद्यपान करतोय, सिगारेट ओढतोय किंवा तंबाखू खाताना दिसत आहे. त्यामुळे तेव्हा त्याच्याशी माझा आवाज जुळणं थोडं कठीण होतं. मग मी तोंडात कापूस ठेवायचो आणि डायलॉग म्हणायचो."

अल्लू अर्जुनला भेटलो नाही

मी अजूनपर्यंत अल्लू अर्जुनला भेटलेलो नाही. आम्ही कधी बोललोही नाही. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया मला मिळालेली नाही. मागच्या वेळी त्याने माध्यमांसमोर डबिंगची स्तुती केल्याचं मी ऐकलं होतं. आता सिनेमात नुकताच रिलीज झाला आहे. काही दिवसांनी यावरही त्याची प्रतिक्रिया येईल अशी अपेक्षा आहे. 

Web Title: Pushpa 2 The Rule Shreyas Talpade put cotton in mouth while dubbing for allu arjun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.